क्राइम थ्रिलर हा प्रकार ओटीटीवर नवीन राहिलेला नाही. खून, तपास, पाठलाग आणि शेवटी गुन्हेगाराचा पर्दाफाश या चौकटीत अनेक मालिका येऊन गेल्या. मात्र ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही वेबमालिका या चौकटीत अडकून राहत नाही. ती गुन्ह्यांपेक्षा गुन्हे करण्याच्या बदलत्या पद्धती आणि त्यामागील तंत्रज्ञानाकडे लक्ष वेधते. त्यामुळे ही मालिका केवळ रहस्य उलगडण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर डिजिटल युगातील गुन्हेगारीचे बदलते स्वरूपही अधोरेखित करते. वर बोनस म्हणजे यातील निखळ विनोद. त्यामुळे वीकेंडला हलकंफुलकं बिंज वॉच करायचे असेल तर त्यासाठी ‘प्रीतम अँड पेड्रो’ हा उत्तम पर्याय असेल.
एकेकाळी गुन्ह्याचा तपास घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्ष साक्षीदार आणि चौकशी एवढ्यापुरता मर्यादित होता. मोबाइल आणि सीसीटीव्हीची मदत घेऊन तपास करण्याच्या पद्धतीलाही बराच काळ लोटला. आता त्यात सोशल मीडिया, डिजिटल व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचीही भर पडली आहे. सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी तितक्याच कौशल्याने तपास यंत्रणांनाही त्याच तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. या बदलाचा वेध मालिका अतिशय सहजपणे घेते. तंत्रज्ञान हे कथानकाचा अविभाज्य भाग बनते.
बदलत्या तंत्रज्ञानाशी ज्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही असा पोलीस निरीक्षक पेड्रोची (अर्शद वारसी) एका चुकीमुळे सायबर सेलमध्ये बदली होते. तिथे त्याच्या अज्ञानामुळे काय गमतीजमती होतात, हे खास पाहण्यासारखे आहे. त्याला काहीही करून दोन-तीन चांगल्या केसचा छडा लावून पुन्हा आपल्या मूळ जागी बदली हवी असते. त्याच्याकडे तक्रार घेऊन आलेल्या प्रीतम (वीर हिरानी) या ‘टेककीडा’ असलेल्या तरुणाशी त्याची गाठ पडते. पुढे दोघांची जोडी संपूर्ण मालिकेभर धुमाकूळ घालते. राजकुमार हिरानी यांचा मुलगा वीर हिरानी याने या वेबमालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
प्रीतम (वीर हिरानी) आणि पेड्रो (अर्शद वारसी) यांची जोडी मालिकेत धमाल उडवून देते. सहा भागांची मालिका आहे. सुरुवातीचे दोन-तीन भाग आपल्याला थोडे उथळ वाटतात पण मग विशेषतः विक्रांत मासेच्या प्रवेशानंतर मालिका काहीशी गंभीर होते आणि चांगले वळणही घेते. मालिकेची पटकथा ही तिची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक भागात नवा धागा समोर येतो, पण तो केवळ धक्का देण्यासाठी आणलेला नसतो. कथानक पुढे नेण्यामागे त्याचा स्पष्ट उद्देश असतो. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते.
मालिकेतील पात्रेही केवळ ‘हिरो’ किंवा ‘व्हिलन’ अशा चौकटीत बसत नाहीत. त्यांच्यातील मानवी पैलू, चुका, संभ्रम आणि निर्णय कथेला वास्तववादी बनवतात. त्यामुळे तपास हा केवळ बुद्धिमत्तेचा खेळ न राहता मानवी स्वभावाचाही शोध ठरतो. दिग्दर्शनात अनावश्यक गोंधळ किंवा थराराचा अतिरेक नाही. अनेक क्राइम मालिकांप्रमाणे रक्तपात किंवा धक्कादायक दृश्यांवर अवलंबून न राहता ही मालिका वातावरणनिर्मितीवर भर देते. त्यामुळे कथेला आवश्यक असलेला ताण कायम राहतो. केवळ सायबर गुन्हेगारी विश्वच नाही तर तंत्रज्ञानाच्या युगातल्या नातेसंबंधांवरही मालिका भाष्य करते.
‘किल्ला’ आणि ‘थ्री ऑफ अस’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचा अनुभव गाठीशी असलेला दिग्दर्शक अविनाश अरुण याने या वेबमालिकेचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे दिग्दर्शन कौशल्य अनेक ठिकाणी दिसते. तंत्रज्ञानावर स्वार झालो तरी मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या हळव्या आठवणींना तंत्रज्ञान हा पर्याय ठरू शकत नाही हे सांगण्यासाठी प्रीतमच्या आईच्या आवाजातील गाण्याची टेप या उपकथानकाचा चांगला वापर केला आहे. मालिकेतील हे हळवे कोपरे दिग्दर्शकाने लीलया सांभाळले आहेत. हा या वेबमालिकेचा पहिला सीझन आहे. पुढील सीझनची प्रेक्षकांची उत्सुकता या सीझनमुळे नक्कीच ताणली आहे.
प्रीतम अँड पेड्रो
क्रिएटर व निर्माते : राजकुमार हिरानी
दिग्दर्शक : अविनाश अरुण
ओटीटी – जिओ हॉटस्टार
