Prithvi Shaw and Akriti Agarwal reconcile after breaking engagement : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ व त्याची गर्लफ्रेंड इन्फ्लुएन्सर व अभिनेत्री आकृती अग्रवाल यांनी महिनाभरापूर्वी साखरपुडा मोडला होता. पण आता मात्र आकृतीने हा निर्णय मागे घेत असल्याची पोस्ट केली आहे. आकृतीने स्वतः तिचा निर्णय मागे घेतला आहे. हा निर्णय काही लोकांनी दिशाभूल घेतल्याने घेतला होता, असं आकृतीने स्पष्ट केलं आहे. तिने काय म्हटलंय ते जाणून घेऊयात.
एक पर्सनल स्पष्टीकरण
माझ्या जवळच्या लोकांना आमच्या नात्याबद्दल आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, असं ते भासवत होते आणि त्यांच्या प्रभावामुळे मी आमचा साखरपुडा मोडला. मी माझ्या होणाऱ्या पतीकडे आणि आमच्या नात्याकडे कसं पाहते यावर त्यांच्या मतांचा प्रभाव पडू दिला. मला वाटतं की माझी दिशाभूल झाली होती आणि ज्या प्रामाणिक संवादाची आम्हाला खरंच गरज होती, तो संवाद न साधताच मी साखरपुडा मोडण्याच निर्णय घेतला.
आम्ही पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय – आकृती अग्रवाल
त्या निर्णयाची आणि त्यामुळे झालेल्या त्रासाची सर्व जबाबदारी मी स्वीकारते. त्यानंतर आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोललो, एकमेकांना समजून घेतलंय आणि पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांसाठी पुरेसे आहोत आणि आम्हाला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. यावेळी, आमचं भविष्य हे आमची स्वतःची समज, विश्वास आणि प्रेम यांच्या आधारेच पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. आता आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करत आहोत, तेव्हा कृपया आमच्या निर्णयाचा आदर करावा, ही विनंती.

आकृती अग्रवाल व पृथ्वी शॉ यांनी ८ मार्च २०२६ रोजी साखरपुडा केला होता. दोघांनी त्यापूर्वीच नातं सोशल मीडियावर अधिकृत केलं होतं. मोठ्या थाटामाटात साखरपुडा केल्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. मात्र, अचानक आकृतीने १७ सप्टेंबर २०२६ रोजी पोस्ट केली आणि पृथ्वीबरोबरचा साखरपुडा मोडत असल्याचं जाहीर केलं. त्या निर्णयाला महिना पूर्ण होण्याआधीच आता तिने ती पृथ्वीबरोबर असल्याचं सांगितलं.

आकृती अग्रवालने साखरपुडा मोडताना काय म्हटलं होतं?
“अतिशय जड अंतःकरणाने मला सांगावं लागत आहे की, मी आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याने आपल्या भविष्यातील वेगवेगळ्या ध्येयांमुळे आणि सध्याच्या परिस्थितीमुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी असली, तरी आमचे मार्ग एकत्र जाण्यासाठी नाहीत, हे आम्ही स्वीकारलं आहे. आमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि सध्या आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं आकृती अग्रवाल म्हणाली होती.

“यापुढील आयुष्यात आम्हा दोघांनाही सुख, शांती आणि आनंद मिळावा, हीच माझी मनापासून इच्छा आहे.” तिने पुढे म्हटलं, “या कठीण काळात कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. आमच्या निर्णयामागील कारणांबाबत कोणत्याही प्रकारचे अंदाज किंवा तर्क लावू नका, ही नम्र विनंती. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद,” असंही आकृतीने म्हटलं होतं. पण आता तिने तिचा निर्णय मागे घेत पृथ्वीबरोबच आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे.
