‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधून प्रियाचं डिजिटल क्षेत्रात पदार्पण

ही हिंदी वेबसीरिज आहे

प्रिया बापट

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जून घेतलं जातं. मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली प्रिया आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकण्यास सज्ज झाली आहे. प्रिया लवकरच एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ असं तिच्या सीरिजचं नाव असून यात ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमधून राजकारणावर आणि प्रिया साकारणार असलेल्या पात्राभोवती या सीरिजची कथा फिरताना दिसत आहे. प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नावं. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने ‘चारचाँद’ लावले. ‘काकस्पर्श’, ‘टाईमपास-२’, ‘टाईम प्लीज’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘वजनदार’ या मराठी चित्रपटांबरोबरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.

हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या माध्यमातून प्रिया डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा गाजवणार यात शंका नाही. ॲप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती आणि नागेश कुकुनूर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये प्रिया दिसणार आहे. नागेश यांनी यापूर्वी बॉलिवूडला ‘डोर’, ‘इक्बाल’, ‘धनक’ यांसारख्या उत्तम कलाकृती दिल्या आहेत. लवकरच हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priya bapat on working with n kukunoor in city of dreams hindi web series

ताज्या बातम्या