लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव आहे. आपल्या सहज सुंदर व दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. त्यामुळे आजही ते हयात नसतानाही अनेक जण त्यांच्याबद्दल बोलत असतात. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण होता. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलं असं कुटुंबं होतं. पतीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खंबीरपणे स्वत:ला सावरत परिस्थितीचा सामना केला. मात्र लक्ष्मीकांत यांचं निधन झालं त्यावेळी त्यासुद्धा त्यांच्या तारुण्यातच होत्या. त्यामुळे त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

प्रिया बेर्डे नेहमीच मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्याबद्दल बोलत असतात. अनेकदा त्या त्यांच्या पतीच्या आठवणी सांगत असतात. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही मुलांना वाढवलं आणि आता दोन्ही मुलं इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेत. पण पतीच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांच्यासाठी पुन्हा उभं राहणं सोप नव्हतं. शिवाय वयानेही त्या फार मोठ्या नव्हत्या त्यामुळे त्यांना बेर्डे कुटुंबाने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा सल्ला दिल्याचं त्यांनीच एका मुलाखतीत म्हटलं आहे.

लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी एकट्याने केला मुलांचा सांभाळा

प्रिया बेर्डे यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल स्वत: सांगितलं होतं. यावेळी त्यांनी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वहिनींनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होतं असं म्हटलेलं. मुलाखतीत एकल पालकत्व आणि पतीच्या निधनानंतर एकटीने मुलांना वाढवताना त्यावेळी आलेला अनुभव याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणालेल्या, “खरं तर आता मी जेव्हा बघते की लोक म्हणतात की आम्हाला खूप काळजी वाटते, डिप्रेशन आलेलं पण मला ना हे शब्दच कधी माहीत नव्हते. एक तर एकुलती एक मुलगी असल्याने आणि घराची जबाबदारी खूप लवकर माझ्यावर आली. त्यामुळे डिप्रेशन, स्ट्रेस या गोष्टी माहीतच नव्हत्या. त्यामुळे जे आयुष्य आपल्या वाट्याला आलंय ना ते जगायचं. त्याच्यामधून वाट काढून पुढे कसं जायचं हेच डोक्यात होतं”.

प्रिया बेर्डे याबद्दल पुढे म्हणाल्या, “माझी आई गेली तेव्हाही मी एकटी पडले, वडील गेले तेव्हासुद्धा एकटी पडले, आजी गेल्यानंतरही तसंच झालं आणि लक्ष्मीकांत गेल्यानंतर तर सगळंच बदललं. आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्याच बाजूने परिस्थिती वाईट होती. मग अशावेळेला आपण खचून तर चालणार नाही कारण लहानपणापासून स्वभाव तसा डगमगणारा नव्हताच. त्यामळे हे नाहीये मग जे आहे त्याबरोबर पुढे जायचं. हे सतत करत आल्याने मला विचार करायला वेळ नाही मिळाला की मी एकल पालकत्व करत आहे. हा आता मी काय करू हा प्रश्न पडला होता कारण मी आठ वर्षे काम करणं बंद केलं होतं. लक्ष्मीकांत गेल्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात करायची होती. आपल्याला कशी कामं मिळणार हा विचार होता. कारण एका नायिकेच्या भूमिका मिळण्याचं वय निघून गेलं होतं, तसं काहीच माझ्यामध्ये उरलं नव्हतं आता लोक ४०शीतही मुख्य भूमिका करतात पण त्यावेळेला असं काही नव्हतं.”

लक्ष्मीकांत यांच्या वहिनीने दिलेला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला

प्रिया बेर्डे पुढे म्हणाल्या, “माझ्याबरोबर बेर्डे कुटुंब होतं. पण प्रत्येकाचं प्रत्येकाला काम असतं. दादा बेर्डेंच्या (लक्ष्मीकांत यांचे मोठे भाऊ) पत्नी वृषाली वहिनी त्यांच्या मी खूप जवळ होते. त्या म्हणालेल्या की प्रिया बघ एक वर्षभरामध्ये दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही. तू अजून लहान आहेस एकटी नाही राहू शकत. मी म्हटलं वहिनी मला तो विचारच करवत नाही. मी दुसऱ्याचा विचारत करू शकत नाही कारण मला माझ्या मुलांचं कसं होणार आहे, ती इतकी लहान होती तर त्यांचं आयुष्यात पुढे कसं होणार हा विचार असल्याने मी दुसरा विचार करू शकत नव्हते. मग मी पाच सहा महिन्यानंतर मुलाना हॉस्टेलला टाकण्याचा निर्णय घेतला.”

प्रिया बेर्डे यांनी पुढे त्यांनी मुलांना परिस्थितीने कुठलाच पर्याय समोर न ठेवल्याने हॉस्टेलमध्ये टाकलं होतं पण तरी त्यांचं त्यांच्या मुलांबरोबर खूप घट्ट नातं आहे असं ही म्हटलं आहे.