प्रियदर्शिनी इंदलकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यात काम करण्याचा अनुभव तिच्याकडे आहे. प्रियदर्शिनी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून तिचे इंडस्ट्रीत अनेक कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यापैकीच एक म्हणजे तिची जवळची मैत्रिण आणि रूममेट अभिनेत्री आरती मोरे.
आज प्रियदर्शिनीचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिची मैत्रीण आणि तिच्याबरोबर मुंबईत एका घरात राहणारी आरती मोरेने तिचे काही अनसीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने या पोस्टला मोठी कॅप्शन देत तिच्या भावनासुद्धा व्यक्त केल्या आहेत.
आरतीची प्रियदर्शिनीसाठी खास पोस्ट
आरती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या पोस्टमधून म्हणाली, “प्रिय रूममेट समजलंच नाही की तू कधी फक्त माझी रूममेट ते कुठे आहेस? जेवलीस का? घरी येणारयस? असं विचारणारी हक्काची व्यक्ती बनलीस. आपल्या न संपणाऱ्या गप्पा, चावी शोधणं, चांगल्या वाईट दिवसांना सामोरं जाणं या सगळ्या गोष्टीमुळे तू कधी माझ्या आवडत्या माणसांपैकी एक बनलीस कळलंच नाही.”
यामधून ती पुढे म्हणाली, “तुझ्यासाठी चहा करू का असं कायम विचारण्यासाठी धन्यवाद. तुझ्यामुळे घराला घरपण आलं. तू खूप चांगली, काळजी घेणारी, मस्तीखोर अशी व्यक्ती आहेस. हे वर्ष तुझ्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं असो अशी प्रार्थना करते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”.
आरतीने यावेळी प्रियदर्शिनीचे ती तिच्या कामात व्यग्र असतानाचे, मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामधून तिच्या वाढदिवसानिमित्त ती तिला सरप्राइज देत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
आरती आणि प्रियदर्शिनी दोघीही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. दोघी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत एकाच घरात एकत्र राहत आहेत. दोघी अनेकदा एकमेकींबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. प्रियदर्शिनी विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते तर आरतीसुद्धा नाटक आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.
