गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपी आणि विद्यार्थी क्रेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्यासाठी दिल्लीक मोठ्या प्रमाणात तरुणांनी एकत्र येत आंदोलन केलं. अनेक सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. अशातच आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून अनेक जण आनंद व्यक्त करत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

नीट पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांची झालेली गैरव्यवस्था आणि त्या घटनेनंतर काहींनी आत्महत्या केल्यानंतर अभिजीत दिपकेच्या सीजेपीने आणि देशभरातील असंख्य तरुणांनी एकत्र येत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यासाठी अगदी दिल्ली पोलिसांचा मारही त्यांनी सहन केला. यादरम्यान हिंदी, मराठी दाक्षिणात्य अशा विविध इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला तर काहींनी सोशल मीडियामार्फत पाठिंबा दिला. अशातच आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवरुन राजीनामा दिल्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. प्रियांका चोप्रा ते आलिया भट्ट अने सेलिब्रिटींनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

पत्रकार Faye D’Souzaने इन्स्टाग्रामवर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रियांका चोप्राने टाळ्यांचा, लाल हृदयाचा आणि हात वर केलेले इमोजी पोस्ट करत तरुणांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयाला पाठिंबा दर्शवला. तर आलिया भट्ट, विकी कौशल आणि इतर अनेक कलाकारांनीही या पोस्टला लाइक केलं आहे.

इन्स्टाग्रामवर कलाकारांच्या प्रतिक्रिया

अभिनेत्री वाणी कपूरने विद्यार्थ्यांच्या चिकाटीला सलाम करत भावनिक पोस्ट शेअर केली. “सतत प्रयत्न करणाऱ्या, प्रश्न विचारत राहिलेल्या आणि आशा न सोडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा क्षण आहे,” असं तिने लिहिलं आहे. सोनम कपूरनेही प्रधान यांच्या राजीनाम्याबाबतच्या पोस्टला लाइक आणि शेअर करून आपला पाठिंबा दर्शवला. तर सोनाक्षी सिन्हानेही इन्स्टाग्राम स्टोरीवर ही बातमी शेअर करत आनंद व्यक्त केला. याशिवाय, सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करत तिने, “भाई… काय करून दाखवलंस?????” असं लिहिलं.

सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

समैय रैना, आयशा खान, अभिजीत बॅनर्जीसह अनेकांनी सोशल मीडियामार्फत याबद्दल प्रतिक्रिया दिली. याचसह मराठी इंडस्ट्रीतीलही दिग्दर्शक हेमंत ढोमे जो सातत्याने याबद्दल त्याच्या प्रतिक्रिया देत तरुणांना पाठिंबा देत होता त्यानेसुद्धा इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त करत आता थांबायचं नाही ही सुरुवात आहे असं त्याने म्हटलं आहे. त्याच्यासह इतरही अनेक मराठी कलाकारांनी स्टोरी पोस्ट करत, पोस्ट लाईक करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

दरम्यान, एकूणच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या या आंदोलनाला अखेर एकप्राकरे यश मिळालं आहे. विद्यार्थ्यांसह या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही सहभागी झाले होते आणि यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं तर दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, अतुल कुलकर्णी, सलमान खान आणि असे अनेक मालिका, चित्रपटांत काम करणाऱ्या कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.