Priyanka Chopra Oscars 2026 Presenter : बहुप्रतिक्षित ९८ व्या ऑस्कर सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. हा सोहळा आयोजित करणारी संस्था ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS) सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी करत आहे. यंदाचा सोहळा आधीच्या सोहळ्यांपेक्षा कसा वेगळा करता येईल, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

हॉलीवूडचा सर्वात मोठा व प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर होय. ऑस्कर २०२६ च्या निमित्ताने आयोजकांनी पुरस्कार सादर करणाऱ्या प्रेझेंटर्सची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्रा हिच्या नावाचाही समावेश आहे.

प्रियांका चोप्राच्या नावाची घोषणा

अकादमीने गुरुवारी, ५ मार्च रोजी प्रियांकाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. ९८ व्या ऑस्करसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रेझेंटर्सच्या तिसऱ्या यादीत तिचं नाव आहे. प्रियांकाबरोबर विल अर्नेट, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ॲन हॅथवे, ग्वेनेथ पाल्ट्रो आणि पॉल मेस्कल यांसारख्या हॉलीवूडमधील मोठ्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. प्रियांकाने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “The 2026 Academy Awards” असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.

Award Banner

प्रियांका चोप्रा पुन्हा मोठ्या मंचावर झळकणार

प्रियांका चोप्राने यापूर्वी २०१६ आणि २०१७ च्या ऑस्कर सोहळ्यांना हजेरी लावली होती. ती दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘गोल्डन ग्लोब्स २०२६’ नंतर पुन्हा एकदा मोठ्या मंचावर दिसणार आहे. गोल्डन ग्लोब्समध्ये तिने के-पॉप स्टार लिसाबरोबर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता – टेलिव्हिजन सीरिज (ड्रामा)’ हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी लिसाने शिमरी ड्रेस घातला होता, तर प्रियांकाने गडद निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस आणि हिऱ्यांचा हार घातला होता.

प्रियांका चोप्राचा चित्रपट आहे ट्रेंडिंग

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती सध्या तिच्या ‘द ब्लफ’ या ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट जगभरात चर्चेत आहे. तसेच ओटीटीवर त्याचा जलवा पाहायला मिळतोय. द ब्लफ ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

ऑस्कर सोहळा कधी व कुठे पाहायचा?

९८ वा ऑस्कर सोहळा हॉलीवूडमधील डॉल्बी थिएटर इथे होईल. भारतीय वेळेनुसार, हा सोहळा १६ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजता सुरू होईल. यंदा एड्रिन ब्रॉडी, मायकी मॅडिसन, झो साल्डाना, जेवियर बार्डेम, ख्रिस इव्हान्स, डेमी मूर आणि माया रुडॉल्फ हे कलाकार देखील पुरस्कार प्रदान करतील. दुसरीकडे यंदा Sinners हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या चित्रपटाला एकूण १६ नामांकनं मिळाली आहेत.