Priyanka Chopra 98th Academy Awards: भारतासाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा प्रियांका चोप्रामुळे खास ठरला. कारण प्रियांका या जागतिक मंचावर पुरस्कार प्रदान करण्यासाठी पोहोचली होती. पती निक जोनसबरोबर तिने अकादमी अवॉर्ड्सना हजेरी लावली. मंचावर तिने महत्त्वाचा पुरस्कार प्रदान केला. प्रियांकाच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियांका चोप्रा डिओरच्या स्ट्रॅपलेस पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. ड्रेसमध्ये ड्रेप्ड डिटेलिंग, लेग स्लिट आणि फेदर्ड ट्रिम होती. तिने डायमंड नेकलेस आणि काळ्या हीलचे पंप घातले होते. तिने केस स्टाइल करून मोकळे सोडले होते.
प्रियांका चोप्राने पती निक जोनसबरोबर रेड कार्पेटवर दिमाखदार एन्ट्री केली. त्यानंतर ऑस्कर विजेता अभिनेता झेवियर बार्डम यांच्याबरोबर ती ९८ व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या मंचावर पुरस्कार प्रदान करण्यासाठी गेली. या दोघांनी ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ या कॅटेगरीतील पुरस्कार प्रदान केला.
पाहा व्हिडीओ
मंचावर बोलताना झेवियर यांनी युद्ध नको असं ठाम मत मांडलं आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश दिला. झेवियर यांच्या या विधानावर प्रियांकाने स्मितहास्य करत मान डोलावली. मग प्रियांका म्हणाली, “चांगल्या कथा आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा कधीच आपल्यापासून दूर नसतो, तो आपल्याला एकमेकांशी जोडतो.”
‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ या कॅटेगरीत ब्राझीलचा द सिक्रेट एजंट, फ्रान्सचा इट वाज जस्ट अॅन अॅक्सिडंट, नॉर्व्हेचा सेंटिमेंटल व्हॅल्यू, स्पेनचा सिरत आणि ट्युनिशियाचा द व्हॉइस ऑफ हिंद राजब यांच्यात चुरशीची लढत होती. यापैकी सेंटिमेंटल व्हॅल्यूने बाजी मारली.
१० वर्षांनी पुन्हा प्रेझेंटर म्हणून ऑस्कर सोहळ्यात पोहोचली प्रियांका चोप्रा
यावर्षी प्रियांका चोप्राबरोबर रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ग्वेनेथ पाल्ट्रो आणि अॅन हॅथवे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी पुरस्कारांचे वितरण केले. ‘द ब्लफ’ फेम प्रियांका चोप्रा जवळपास १० वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेझेंटर म्हणून ऑस्करमध्ये परतली. प्रियांकाने पहिल्यांदा २०१६ मध्ये अभिनेता लीव्ह श्रायबरबरोबर ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’चा पुरस्कार प्रदान केला होता. २०१७ मध्ये ती पाहुणी म्हणून उपस्थित होती, तर २०२१ मध्ये प्रियांका आणि निक जोनस यांनी ऑस्कर नामांकनांची अधिकृत घोषणा केली होती.
