निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने काही दिवसांपूर्वी सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचे पालकत्त्व स्वीकारले. त्याच्या या निर्णयानंतर चित्रपट वर्तुळात अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण, सोशल मीडियावर मात्र करणच्या या निर्णयाविषयी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. या साऱ्या परिस्थितीला तोंड देत करणने एक वडील म्हणून आता त्याच्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

नुकतेच करण त्याच्या मुलांना घेऊन आपल्या घरी गेला. यश आणि रुहीच्या घरी येण्याने बी-टाऊनमधील काही सेलिब्रिटी त्याच्या घरी गेले होते. यश आणि रुही घरी येण्याआधीच करणने त्यांच्यासाठी एक खास खोली तयार करुन घेतली आहे. मुख्य म्हणजे या खास खोलीच्या सजावटीची सर्व जबाबदारी शाहरुख खानची पत्नी गौरी खानने पार पाडली आहे. शाहरुख खान आणि करण जोहर हे खूप चांगले मित्र आहेत किंबहुना त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्यामुळे गौरीनेही मोठ्या प्रेमाने करणच्या मुलांची ही खोली सजवली आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यश-रुहीच्या खोलीचे काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये या सजावटीचे श्रेय गौरी खानला दिले आहे. या खोलीच्या इंटेरिअरमध्ये कोणत्याही भडक रंगाचा वापर केला नसून पांढऱ्या रंगाने खोलीचे सौंदर्य खुलवण्यात आले आहे. यामध्ये लक्ष वेधत आहेत ते म्हणजे कार्टून प्रिंट्स आणि काही खेळणी.

सोशल मीडियावरही करणने पोस्ट केलेले हे फोटो सध्या चर्चेत आहेत. गौरी खान इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात सक्रीय आहे. याआधी तिने अभिनेता रणबीर कपूरच्या नव्या घराचेही इंटेरिअर डिझायनिंग केले होते. त्यावेळी ऋषी कपूर यांनी गौरीची प्रशंसा करत तिच्या कलेची दाद दिली होती.