इतर व्यवसायांप्रमाणे करोनाकाळात नाटय़ व्यवसायालाही उतरती कळा लागल्याने गेले सहा महिने कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून नाटय़ व्यवसायालाही परवानगी द्यावी, अशी मागणी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाने सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे बुधवारी झालेल्या बैठकीत केली. या वेळी निर्माता संघाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्यात आली.

नाटय़ व्यावसायिक संघाने नाटय़ व्यवसायाशी संबंधित घटक संस्थांची सहमती घेऊन राज्य शासनाला १५ सप्टेंबरला मार्गदर्शक तत्त्वांचा नमुना तयार करून सादर केला होता. तसेच व्यवसायाला आवश्यक उभारी देण्यासाठी अर्थसाहाय्याची मागणी केली. त्यावर सांस्कृतिक मंत्र्यांनी ३० सप्टेंबरला संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवले. बैठकीत नाटय़गृहांकरिता मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना देशमुख यांनी सांस्कृतिक सचिवांना दिल्या. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या विनंतीवरून नाटय़ कलावंत संघ, रंगमंच कामगार संघटना, नाटय़ व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात येत्या पंधरा दिवसांत चर्चा करणार असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.

सुरक्षेसाठी..

*   तिकीट विक्री बूथचे निर्जंतुकीकरण आणि तिकीट देताना प्रेक्षकांमध्ये सुरक्षित अंतर

*   प्रत्येक प्रयोगानंतर नाटय़गृहाचे तसेच प्रयोगाआधी आणि मध्यंतराआधी प्रसाधनगृहाचे निर्जंतुकीकरण

*   नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणी आणि सॅनिटायझरची व्यवस्था

*  सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मुखपट्टी, हातमोजे, फेस शील्ड बंधनकारक

*   रंगभूषा खोली, तंत्रज्ञांच्या जागा, नेपथ्य यांचे निर्जंतुकीकरण