आजची पिढी गोंधळलेली आहे… अनिश्चित भवितव्याने भांबावलेली आहे… प्रचंड स्पर्धेला तिला तोंड द्यावं लागतं आहे… आणि अपयशानं ती लगेचच खचूनही जाताना दिसते… वगैरे सगळ्या गोष्टी खर्‍याच असल्या तरी या पिढीसमोरील आव्हानं पाहता हे साहजिकही आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. त्यातून त्यांना मार्ग काढायचा आहे. आणि यातूनच आपल्या जीवनाचं श्रेयस आणि प्रेयसही त्यांना प्राप्त करायचं आहे. ही अशक्य नसली तरी बरीच अवघड गोष्ट आहे. अशीच ‘प्रोजेक्ट अइ’मधील मिनी आणि पिनाकी यांची गोष्ट आहे.

मिनी ही मालिका आणि नाट्य क्षेत्रात काहीतरी करू पाहणारी, त्यासाठी घरदार सोडून धडपडणारी एक तरुणी आहे. मात्र, तिच्याकडे त्यासाठीच्या समजुतीचं भांडवल मात्र अल्प आहे. तिला आजूबाजूच्या अनेक गोष्टींची नीट माहितीच नाहीए. तिला अभिनयातील तंत्र आणि मंत्र यांबद्दलही सखोल जाणीव नाहीए. तरीही यातच आपलं करीअर घडावं यासाठी ती आपल्या परीनं धडपडतेय. त्यासाठी घरदार सोडून ती आलीय. पण इथल्या कट थ्रोट कॉम्पिटिशनमध्ये तिची डाळ शिजत नाही. शिवाय लॉबिंग, ओळखीपाळखी हाही मुद्दा तिच्याविरोधात जाणारा आहे. त्यामुळे जंग जंग पछाडूनही तिला काम मिळत नाहीए.

तीच गोष्ट पिनाकीची. तो एक संगीतरचनाकार आहे. या क्षेत्रात ‘ब्रेक’ मिळावा म्हणून धडपडतो आहे. काही चुटुरपुटूर कामं त्याला मिळतातही, पण त्याने तो समाधानी नाहीए. त्याची गत मिनीपेक्षा वेगळी नाहीए. ते याबाबतीत एकमेकांना मदत करू इच्छितात, पण आपलंच जिथे धड बस्तान बसत नाहीए, तिथं आपण एक-दुसर्‍याला काय मदत करणार, हीच दोघांचीही परिस्थिती आहे.

यादरम्यान मिनीकडे एक प्रोजेक्ट येतं… बहिणाबाईंवरील नाटकाचं! ती त्यामुळे आनंदित होते. पण त्यातील भाषा आणि बहिणाबाईंचं जगणं ती समजू शकत नाहीए. तिची तेवढी झेपच नाहीए. ती त्याबद्दल पिनाकीला सांगते. तो बहिणाबाईंच्या रचनांना आधुनिक संगीताचा साज चढवण्याबद्दल सुचवतो. पण मिनीला ही कल्पना पसंत पडत नाही.

दरम्यान कला क्षेत्रात हात-पाय मारूनही काही भरीव पदरी पडत नाही म्हणताना हताश, निराश झालेली मिनी या क्षेत्राला चक्क राम राम ठोकून नोकरीच्या चाकरीत शिरते. तिथे तिची अशा एका व्यक्तीशी गाठ पडते, की जी मिनीची कला आणि जगण्याबद्दलची जाणीव समृद्ध करते. त्यातून तिला बहिणाबाई हळूहळू कळत जाते. आणि पुन्हा एकदा बहिणाबाईंवरील प्रोजेक्ट तिला खुणावू लागतो. ती पिनाकीला मदतीला घेऊन तो सादर करते. आणि सुखद आश्चर्य म्हणजे त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. दोघंही खूश होतात. दिवसागणिक नवनवीन बहिणाबाई त्यांना कळत जाते. जणू बहिणाबाई त्यांच्यात भिनत जाते… एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही!

लेखक राजीव जोशी यांनी आजच्या पिढीच्या कलाजाणिवा आणि त्यांची त्यांना ओळख पटत जाणं यावर आधारलेलं हे नाटक लिहिलं आहे. बहिणाबाईंसारख्या अशिक्षित, पण जीवनानुभवांनी अत्यंत समृद्ध अशा स्त्रीचं त्यातून उगवलेलं काव्य आजच्या पिढीसमोर आणणं हाही उद्देश त्यामागे आहे. खरं तर आजच्या काळात ते धाडसाचंही आहे. आजच्या आदर्श संस्कृती, मूल्यं यांच्याशी काडीमोड घेतलेल्या समाजापुढे बहिणाबाई मांडणं हेच मुळी कुणीही आपल्याला खुळ्यात काढण्यासारखं आहे. पण राजीव जोशी यांनी हट्टाग्रहानं ते करायचं मनावर घेतलं आणि
बहिणाबाईंवरील ही कलाकृती पेश केली आहे. दोन भिन्न काळांतील माणसं त्यांनी यानिमित्तानं एकत्र आणली आहेत. त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं यांना त्यांनी यानिमित्तानं हात घातला आहे.

बहिणाबाई साकारता साकारता तिच्याशी एकरूप झालेली आजची पिढी या नाटकाद्वारे आपल्यासमोर येते आणि एक समाधानाचा सुस्कारा आपण सोडतो. दिग्दर्शक हेमंत भालेकर यांनी अनेक अनवट वळणांनी भरलेलं हे नाटक बसवलं आहे. कसलीही कलाजाणीव नसलेल्या, गतकाळाबद्दल, तत्कालीन माणसांबद्दल, समाजाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला त्याबद्दल सांगणं, समजावून देणं ही मोठीच जबाबदारी त्यांनी यात शिरावर घेतली आहे आणि चोख पार पाडली आहे. जणू सुरवंटांचं फुलपाखरू करण्याचं दायित्वच त्यांनी पत्करलं आहे. तथापि मिनी आणि पिनाकीचं पूर्वजीवन ज्या ठसठशीतपणे प्रेक्षकांसमोर यायला पाहिजे त्या तीव्रतेनं ते येत नाही. याचं कारण या भूमिका साकारणार्‍या कलाकारांचे सदोष शब्दोच्चार आणि शब्दफेक. तोंडातल्या तोंडात आणि पूर्ण उच्चारांच्या अभावी त्यांचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत नीटसं पोहोचत नाही. त्यावर काम होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट बहिणाबाईंबद्दलची त्यांची कमालीची अनभिज्ञता. खरं तर किमान शालेय पुस्तकांतून तरी बहिणाबाई मुलांपर्यंत पोहोचलेल्या असतात. पण तीही जाणीव यांना न दिसणं हे दुग्ध्यात पाडणारं आहे. असो. पण उत्तरार्धात मात्र प्रत्यक्ष बहिणाबाईच साक्षात रंगमंचावर प्रकटल्यावर नाटक अचानक गती घेतं आणि एका वेगळ्याच उंचीवर जातं. हा भाग खरोखरीच प्रत्ययकारी झाला आहे. त्यात साक्षात बहिणाबाईंची भूमिका करणार्‍या कलावतीचा महत्त्वाचा वाटा आहेच, पण हा भाग लिखाणदृष्ट्या आणि सादरीकरणाच्या अंगानंही उत्तम झाला आहे. बहिणाबाईंचा चष्मा मिनी तिच्या भूमिकेत डोळ्यांवर चढवते आणि तिला बहिणाईची दृष्टी प्राप्त होते, हे अत्यंंत कल्पकतेनं दिग्दर्शकानं दाखवलं आहे.

प्रदीप पाटील यांनी बहिणाबाईंचं जात्याचं प्रतीक वापरून सूचक नेपथ्य उभारलं आहे. विलास हुमणे यांनी प्रकाशबदलांतून घटना-प्रसंगांतील नाट्य खुलवलं आहे. ओंकार घाडी यांनी बहिणाबाईंच्या काव्याचा पोत अचूक ओळखून संगीत दिलं आहे. आणि त्यांनीच पिनाकीची भूमिका करून त्याला न्यायही दिला आहे. देवेंद्र शेलार यांनी नृत्य-आरेखनातून बहिणाबाईंच्या काव्यातील तरल नजाकत नेमकेपणानं पोहोचवली आहे. प्रकाश निमकर यांची वेशभूषा निर्मितीमूल्यांत भर घालणारी आहे. कविता मानकर-जाधव या बहिणाबाईंचं साक्षात दर्शन तर घडवतातच; पण तिच्या जगण्यातलं काव्यही उत्कटपणे बाहेर काढतात. त्यांचं दिसणं-असणं नाटकाला एक जास्तीचं परिमाण देतं. आरोही जैन या मिनीच्या भूमिकेत सदोष शब्दफेकीमुळे तितक्याशा भावत नसल्या तरी त्यांचं पुढे बहिणाईत झालेलं रूपांतरण मात्र सहजसुंदर वाटतं. तीच गोष्ट पिनाकी झालेल्या ओंकार घाडी यांची. त्यांचा बहिणाबाईंच्या काव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जिथे बदलतो, तिथे ते क्व्हिहंसिंग वाटू लागतात. एका वेगळ्या परिमाणाचं नाटक पाहिल्याचं समाधान ‘प्रोजेक्ट अइ’ नक्कीच देतं.