‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या भव्य यशानंतर निर्माता पुनीत बालन ‘द हिंदूबॉय’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत, ज्यात हिंदीतील लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘द हिंदूबॉय’ ही एका हिंदूपंडित तरुण मुलाची कथा आहे, ज्याला त्याच्या संरक्षणासाठी म्हणून काश्मीरमधून बाहेर पाठवण्यात येते. मग त्याला काय अनुभव येतो आणि ३० वर्षांनंतर जेव्हा तो आपल्या घरी परततो तेव्हा त्याचे काय होते? याचा परामर्श या चित्रपटाच्या कथेतून मांडला गेला आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले की, ‘‘मी अनेकदा काश्मीरला जातो. तेथील लोकांच्या वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. मला नेहमीच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. म्हणून ‘द हिंदूबॉय’ या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले. अलीकडेच ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट खूप गाजला आहे, मला आशा आहे की हा चित्रपट देखील लोकांना नक्कीच आवडेल.’’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज बकाल यांनी केले असून त्याची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.