कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या मृत्यूला एका आठवड्याहून अधिक वेळ झाला आहे. मात्र आपला आवडता कलाकार आता आपल्यात नाही हे त्याच्या चाहत्यांना पटत नाहीय. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा मृत्यू झालाय या धक्क्यातून त्याचे चाहते अजून सावरु शकलेले नाहीत. कर्नाटमध्ये आतापर्यंत पुनीतच्या मृत्यूनंतर १० जणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. कर्नाटमध्ये पुनीतचे मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांना पुनीतच्या मृत्यूचा एवढा धक्का बसलाय की त्यांच्यापैकी अनेकांनी थेट आत्महत्या केली आहे.

पुनीतचा एवढा प्रभाव त्याच्या चाहत्यांवर आहे की त्याच्या मृत्यूनंतर त्याने ज्याप्रमाणे नेत्रदान केलं तसं नेत्रदान करता यावं म्हणूनही तीन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. न्यूज १८ ने सुत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये पुनीतच्या मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुनीतच्या कुटुंबियांनी त्याच्या चाहत्यांना शांत राहण्याचं आणि भलतं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यामध्ये पुतीनच्या दहा चाहत्यांचा जीव गेला असून त्यापैकी सात जणांनी आत्महत्या केलीय. तर तीन जणांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या मृत्यू झालाय. तर आत्महत्या केलेल्यांपैकी तीन जणांनी नेत्रदान करता यावं म्हणून जीव दिल्याची माहिती समोर आलीय. ३ नोव्हेंबर रोजी टुमकुरमध्ये राहणाऱ्या भरतने फाशी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने, “मला अप्पूच्या मरणाचं दु:ख सहन होत नाहीय. मी त्यांच्यासोबत राहण्यासाठी आत्महत्या करत आहे. त्यांच्याप्रमाणेच माझे डोळेही मृत्यनंतर दान करण्यात यावेत,” असं भरतने म्हटलं आहे.

बेंगळुरु शहरामधील अनेकल येथे राहणाऱ्या राजेंद्रनेही नेत्रदान करण्यासाठी आत्महत्या केली आहे. त्याने ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रामनगर जिल्ह्यामधील चन्नापटना येथे राहणाऱ्या २६ वर्षीय व्यंकटेशने ४ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आपल्या आवडत्या कलाकाराच्या मृत्यूमुळे व्यंकटेश दु:खी होता आणि पुनीतच्या मृत्यूनंतर व्यंकटेशने अन्नाचा त्याग केला होता, असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे.

पुनीत राजकुमारला शुक्रवारी, २९ ऑक्टोबर २०२१ दुपारी एक ते दीडच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.