scorecardresearch

देशातील मल्टिप्लेक्स उद्योगात मोठा बदल; पीव्हीआर आणि आयनॉक्स लीझरची विलीनीकरणाची घोषणा

या विलीनीकरणानंतर पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली हे कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.

PVR INOX merger and its impact on entertainment industry
(फोटो सौजन्य – financial express)

देशातील मल्टिप्लेक्स उद्योगात मोठा बदल होणार आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्सची साखळी असलेला पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स लीझर यांच्यातील विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. वास्तविक, पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीच्या बोर्डांची रविवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बराच वेळ बैठक पार पडली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या विलीनीकरणानंतर पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली हे कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.

पीव्हीआर लिमिटेडने रविवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने आयनॉक्स लीजर लिमिटेडच्या विलीनीकरणाच्या योजनेला मान्यता दिली आहे. आयनॉक्सच्या बोर्डाने देखील विलीनीकरण योजनेला मान्यता दिली आहे. या करारानंतर आता चित्रपट प्रदर्शन उद्योगाचे नवे रूप पाहायला मिळणार आहे. विलीनीकरणानंतर, पीव्हीआर आणि आयनॉक्स लीजर यांच्याकडे संयुक्तपणे भारतभर १,५०० पेक्षा जास्त स्क्रीन्स असतील.

पीव्हीआर आणि आयनॉक्स दोन्ही कंपन्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध आहेत. आयनॉक्सच्या १० समभागांसाठी पीव्हीआरचे तीन शेअर्स एकत्रीकरणासाठी शेअर एक्सचेंज रेशो असेल. विलीनीकरणानंतर, आयनॉक्स प्रवर्तकांचा एकत्रित घटकामध्ये १६.६६ टक्के हिस्सा असेल, तर पीव्हीआर प्रवर्तकांकडे १०.६२ टक्के हिस्सा असेल. विलीनीकरणानंतर, पीव्हीआरच्या विद्यमान प्रवर्तकांसह आयनॉक्सचे प्रवर्तक विलीन झालेल्या संस्थेमध्ये सह-प्रवर्तक असतील.

माध्यमांच्या वृत्तानुसार, एकत्रित विलीन झालेली कंपनी १६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली एक मोठी कंपनी तयार करेल. आयनॉक्स लीझरचा शेअर शुक्रवारी ६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून रु. ४७० प्रति शेअर वर बंद झाला होता, ज्याचे मार्केट कॅप रु. ५,७०० कोटी होते. पीव्हीआरचे शेअर्स शुक्रवारी १.५५ टक्के वाढून १८०४ प्रति शेअर वर बंद झाले, ज्याचे मार्केट कॅप ११,१०० कोटींहून अधिक आहे.

आयनॉक्स सध्या ७२ शहरांमधील १६० मालमत्तांमध्ये ६७५ स्क्रीन चालवते, तर पीव्हीआर ७३ शहरांमध्ये १८१ मालमत्तांमध्ये ८७१ स्क्रीन चालवते. विलनीकरणानंतर १०९ शहरांमधील ३४१ मालमत्तांवर १,५४६ स्क्रीन चालवणारी एकत्रित संस्था भारतातील सर्वात मोठी चित्रपट प्रदर्शन कंपनी बनणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pvr inox merger and its impact on entertainment industry abn

ताज्या बातम्या