R Madhavan Fitness Secret and Wife Reaction Story: वयाची पन्नाशी ओलांडली तरी अभिनेता आर. माधवनची तरुणाईमधील क्रेझ आजही कायम आहे. वयाच्या ५६ व्या वर्षीही त्याचा फिटनेस थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे, फिट राहण्यासाठी तो कोणताही नियमित व्यायाम किंवा रनिंग करत नाही. तसेच त्याने आजपर्यंत कोणतीही सर्जरी किंवा औषधं घेतलेली नाही. फक्त विशिष्ट आणि कडक जीवनशैली पाळून त्याने स्वतःला फिट ठेवले आहे. माधवन त्याच्या फिटनेसचे श्रेय शिस्तीला देतो.

माधवनने करिअरच्या सुरुवातीला ‘अलाईपायुथे’, ‘मिन्नाले’ आणि त्याचा हिंदी रिमेक ‘रहना है तेरे दिल में’ हे चित्रपट केले. या चित्रपटांनंतर माधवन नॅशनल क्रश बनला होता आणि त्याला ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख मिळाली. माधवन या वयातही त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

२०२१ मध्ये ‘टेलिग्राफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत माधवनने म्हटलं होतं की, महिलांना तो अजूनही इतका आकर्षक का वाटतो हेच त्याला समजत नाही. तसेच सोशल मीडियावर तो शेअर करत असलेल्या शर्टलेस फोटोंवर त्याची पत्नी सरिता बिर्जेची काय प्रतिक्रिया असते, याबद्दलही माधवनने सांगितलं होतं.

‘महिलांना मी इतका आकर्षक का वाटतो?’

२०२१ मध्ये ‘टेलिग्राफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत माधवनने महिलांमधील आपल्या लोकप्रियतेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. तो म्हणाला, “मला या गोष्टीची खरंच लाज वाटते. मी काही खूप हँडसम किंवा हॉट दिसत नाही. हृतिक रोशन ‘ग्रीक गॉड’ सारखा दिसतो, त्यामुळे त्याची महिलांमध्ये क्रेझ असणं साहजिक आहे. मी स्वतः त्याचा फॅन आहे. पण महिलांना माझ्याबद्दल काय आकर्षक वाटतं, हे मला अजूनही समजत नाही.”

When Sarita called out R Madhavan over his shirtless photos
आर माधवनचा शर्टलेस फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

पत्नी सरिताची मजेशीर प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील आपल्या शर्टलेस फोटोंवर पत्नी सरिता बिर्जेच्या प्रतिक्रियेची आठवण सांगताना माधवन म्हणाला, “माझ्या पत्नीने मला सरळ बजावलं होतं,’प्लीज तुझ्या वयाला शोभेल असं वागशील का आणि हे असले फोटो पोस्ट करणं बंद करशील का?’ खरं सांगायचं तर, मला या लोकप्रियतेचे कारण माहीत नाही. पण मिळालेल्या प्रेमाचा अनादर न करता मला सध्या तरी याचा आनंद घेऊ द्या.”

‘लोक विसरतील ही भीती होती का?’ माधवनला पडला प्रश्न

ते फोटो पोस्ट करण्यामागच्या कारणाचा विचार करताना माधवन पुढे म्हणाला, “मी स्वतःलाच विचारतो की मी ते फोटो का पोस्ट केले होते? माझी क्रेझ अजून टिकून आहे का हे पाहण्यासाठी ते केलं होतं, की लोक मला विसरून जातील अशी भीती मनात होती? कारण काहीही असो, पण आता मी असे फोटो फारसे शेअर करत नाही.”