R. Madhavan Instagram Post about Wife: बॉलीवूडमधील सर्वात आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता आर. माधवन आणि त्याची मराठमोळी पत्नी सरिता बिर्जे होय. या दोघांनी १९९९ मध्ये लग्न केलं होतं, त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना आठ वर्षे डेट केलं होतं. कोल्हापूरमधील एका ‘पब्लिक स्पीकिंग’ क्लासमध्ये सरिता माधवनची विद्यार्थिनी होती. पुढे सरिता एअर होस्टेस झाली आणि तिने माधवनला डिनरला बोलावलं. या भेटीनंतर हळूहळू त्यांच्यात प्रेम फुललं. माधवन त्याच्या मुलाखतींमध्ये आपल्या पत्नीबद्दल भरभरून बोलत असतो. तो पत्नी सरिताला ‘परफेक्ट पार्टनर’ मानतो. त्याने नुकतीच एक क्युट पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्याने अशा ५ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पुरुषांना आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित असतात, पण त्या उघडपणे बोलायला लाजतात.
माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘पुरुषांना आवडणाऱ्या ५ सवयी, ज्या पत्नीला सांगण्यास ते लाजतात’ या विषयावरील एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये खालील गोष्टी नमूद केल्या होत्या-
- १. कधीकधी तिने पुढाकार घ्यावा.
- २. सर्वांसमोर तिने त्याचे कौतुक करावे.
- ३. कधीकधी अनपेक्षितपणे अचानक प्रेम व्यक्त करावे.
- ४. त्याच्यावर असलेला विश्वास स्पष्टपणे बोलून दाखवावा.
- ५. बाहेरच्या लोकांपेक्षा पतीला जास्त महत्त्व द्यावे.

काही महिन्यांपूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये आर. माधवनने, तो बॉलीवूड अभिनेता असूनही त्याचं लग्न इतकी वर्षे यशस्वीरीत्या कसं टिकलं, याबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणाला, “इतर कोणत्याही जोडप्याप्रमाणे आमचीही तितकीच भांडणं होतात. पण आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे. सरितासाठी मी केवळ एखादा मोठा स्टार किंवा अभिनेता नाही, ज्याची पत्नी असल्याचा तिने अभिमान बाळगावा. तिच्या दृष्टीने मी तिचा तोच जोडीदार आहे, ज्याने तिच्यावर प्रेम केलं आणि जो तिचा आदर करतो. त्याचबरोबर ती माझ्या आयुष्यात असल्याने मी किती नशीबवान आहे याची जाणीव करून देण्याची एकही संधी मी सोडत नाही.”
८ वर्षे डेटिंग व लग्नाच्या ६ वर्षांनंतर २००५ मध्ये माधवन आणि सरिता बिर्जे यांना मुलगा झाला. त्याचं नाव वेदांत आहे. वेदांतने वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता वेगळं करिअर निवडलं. वेदांत उत्तम जलतरणपटू आहे आणि त्याला त्यातच करिअर करायचं आहे. २०१९ मध्ये वेदांतने ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिप’मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकलं होतं.
