‘रन’ हा तमिळ चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. हा तमिळ सिनेसृष्टी आणि आर. माधवनसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता. या चित्रपटाने माधवची पडद्यावरील प्रतिमा पूर्णपणे बदलली. आधी रोमँटिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या माधवनला या चित्रपटाने एक दमदार अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळवून दिली. या चित्रपटाने करिअर कसे बदलले याबद्दल माधवनने सांगितलंय.
‘द हिंदू’शी बोलताना माधवन म्हणाला, “हा माझ्या करिअरमधील टर्निंग पॉइंट होता. प्रेमळ भूमिका केल्यानंतर मी कोणाला तरी जोरदार मारहाण करेन असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा तो सबवे सीन झाला, तो केवळ चित्रपटासाठीच नाही तर माझ्या करिअरसाठीही खूप मोठा ठरला. लोकांना अभिनयाबरोबरच माझी इतर कौशल्येही पाहायला मिळाली. ‘हा अॅक्शनही करू शकतो. हा रोमान्स आणि अॅक्शन दोन्ही करू शकतो,’ असं लोक म्हणू लागले.”
दिग्दर्शक एन. लिंगुसामी यांचं कौतुक करत माधवन म्हणाला, “एन. लिंगुसामी यांचा दृष्टीकोन कमाल होता. पहिला अॅक्शन सीन त्यांनी मला जसा सांगितला होता, हुबेहूब तसाच तो शूट केला. खरं तर ते मला म्हणाले होते, ‘जेव्हा तो माणूस तुझ्यावर पहिला वार करेल, तेव्हा तू त्याला इतक्या जोरात मारशील की तो मेलेल्या उंदरासारखा खाली पडेल.’ आणि तो माणूस अगदी तसाच खाली पडला.”
मणी रत्नम यांच्याबद्दल माधवन म्हणाला…
‘रन’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला दिग्गज दिग्दर्शक मणी रत्नम आणि गौतम वासुदेव मेनन उपस्थित होते. त्यांच्या प्रतिक्रिया सांगताना माधवन म्हणाला, “मणी रत्नम सर, गौतम वासुदेव मेनन आणि इतर सर्वांसाठी आम्ही एक खास शो ठेवला होता. मध्यंतरानंतर लगेचच मणी रत्नम माझ्याकडे खूप वेगळ्याच नजरेने पाहू लागले. मला वाटतं मी अॅक्शन हिरो बनू शकतो, ही शक्यता त्यांनी माझ्यात आधी पाहिली नव्हती. मणी सर आणि गौतम सर तो सीन पाहत होते, ते मला आताही आठवतंय. ते आपापसात बोलत होते, पण जेव्हा कोणी आपल्याकडे पाहून काहीतरी बोलतं तेव्हा ते लगेच समजतं.”
एका सीनमुळेच चित्रपटाला होकार दिला होता – माधवन
‘रन’मधील त्या आयकॉनिक सीनमुळेच हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला होता, असंही माधवनने स्पष्ट केलं. “मला आठवतंय, फक्त त्या एका शॉटमुळे मी चित्रपटाला होकार दिला होता. मी दिग्दर्शकांना म्हटलं होतं, ‘जर लोकांना हा सीन पाहून विश्वास बसला की हा खरोखरच ‘शिवा’ आहे आणि मी हे करू शकतो, तर चित्रपट सुपरहिट होणार.’ माझ्यासाठी तो एक शॉट पुरेसा होता.”
पुढे माधवन म्हणाला, “मी अॅक्शन सीन्ससाठी कधीही ट्रेनिंग घेतलं नाही. आजकालचे तरुण डान्स आणि अॅक्शनचे ट्रेनिंग घेतात ते मी पाहतो आणि मला त्यांचा खूप आदर वाटतो. पण मी मात्र सेटवर काम करता करताच सगळ्या गोष्टी शिकलो.”
लोक मला अॅक्शन हिरो म्हणून स्वीकारतील याची खात्री पटली – माधवन
माधवनने स्टंट कोरिओग्राफर पीटर हेन आणि सिनेमॅटोग्राफर जीवा यांना या सीनचे सगळे श्रेय दिले. “पीटर हेनने उत्तमरित्या तो सीन कोरिओग्राफ केला. तो सीन आम्ही सबवेच्या सेटवर शूट केला होता. तो शटरचा सीन होता, पण तो सबवेच्या सेटवर केला होता. त्यांनी त्यासाठी पूर्ण सेट तयार केला होता. आम्ही खऱ्या सबवेमध्येही सहज शूट करू शकलो असतो, पण जीवा सरांना कॅमेरा छताच्या वर न्यायचा होता, जेणेकरून मी मारलेला शॉट आणि तो माणूस खाली पडून हलत नाहीये हे स्पष्ट दिसायला हवं,” असं माधवनने सांगितलं.
“आम्ही तो सीन शूट करत होतो, तेव्हाचा तो फायटर मला अजूनही स्पष्ट आठवतो, त्याचा चेहरा माझ्या मनात आहे. तो खूप चांगला स्टंट आर्टिस्ट होता. मी त्याला मारलं, ते खरं नव्हतंच, पण तो ज्या प्रकारे खाली पडला… तो थेट जमिनीवर आदळला आणि तसाच पडून राहिला. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग जमिनीला टेकलेला होता. तो अजिबात हलला नाही. त्यानंतर त्याची हालचालही झाली नाही. मी या सीनची जशी कल्पना केली होती अगदी तसंच सगळं घडलं. त्या क्षणापासून मला जाणवलं की लोक मला अॅक्शन हिरो म्हणून नक्कीच स्वीकारतील,” असं आर माधवन म्हणाला.
