फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना अभिनयाबरोबरच शेती आणि बागकामाची प्रचंड आवड आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेता राजेश कुमार याने शेतीसाठी अभिनय सोडला होता. त्याच्या या निर्णयाची खूप चर्चा झाली होती, पण या प्रवासात त्याचं आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्यावर जवळपास २ कोटींचं कर्ज झालं. सलमान खानलाही शेतीची आवड आहे. त्याचबरोबर जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर हे कलाकारही फार्महाऊसवर वेळ घालवतात व मातीशी जोडलेले राहतात.
या सर्वांपैकी ‘धुरंधर’ फेम आर. माधवनने मात्र एक अनोखं आणि कठीण आव्हान स्वीकारलं होतं. त्याने तामिळनाडूतील पालनी येथे एक ओसाड, पडीक जमीन विकत घेतली आणि तीन वर्षांच्या सतत परिश्रमानंतर तिथे नारळी बाग फुलवली. या शेतात त्याने ‘नॉन-हायब्रिड’ नारळांची लागवड केली. हे नारळ गोड पाण्यासाठी आणि विशिष्ट सुगंधासाठी ओळखले जातात.
माधवनने केलेली पोस्ट
ही गोष्ट २०२० मध्ये समोर आली, जेव्हा माधवनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. “अखेर तामिळनाडूतील पालनी येथील नारळ लागवडीचा प्रकल्प पूर्ण झाला. एखादा सिद्धांत प्रत्यक्षात उतरताना पाहणं खूप समाधानकारक असतं. या जमिनीच्या नवीन स्थानिक मालकांचं अभिनंदन आणि त्यांना खूप प्रेम. आम्हाला जसं समाधान मिळालं, तसंच त्यांनाही मिळो. ही पवित्र जागा सोडताना थोडं वाईट वाटतंय. पालनीतील सर्वांचे आभार,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं.

“हा एक विलक्षण प्रकल्प होता. यात आम्ही ओसाड जमिनीवर अत्यंत गोड आणि सुगंधी, शुद्ध बुटक्या प्रजातीचे नारळ पिकवले. मी लवकरच स्थानिक शेतकऱ्यांसाठी यावर एक लेख लिहेन आणि माहिती प्रसिद्ध करेन,” असं आर माधवनने याला एक प्रकल्प म्हणत एक्सवर लिहिलं होतं.
आर माधवनने व्यक्त केलेल्या भावना
‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत माधवनने आपला अनुभव सांगितला होता. “ती ओसाड जमीन पुन्हा जिवंत झालेली पाहणं आणि तिथून अपेक्षित उत्पन्न मिळणं, हा अनुभव थक्क करणारा होता. जमिनीसाठी योग्य खत तयार करण्यापासून ते विहिरीत योग्य प्रकारचे मासे सोडण्यापर्यंत, या प्रवासातील प्रत्येक गोष्ट शिकणं खूप चांगलं होतं. यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले,” असं आर माधवन म्हणाला होता.
एएनआयशी बोलताना माधवनने हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव असल्याचं म्हटलं होतं. “हा आमच्या आयुष्यातील अत्यंत समाधानकारक अनुभव ठरला आहे. जमिनीचा पोत सुधारून ती पुन्हा सुपीक झालेली पाहणं खूपच भारी होतं. आम्ही आता हाच प्रयोग भारताच्या इतर भागात आणि जगभरात राबवणार आहोत,” असं त्याने म्हटलं होतं. दरम्यान, करोना लॉकडाउनदरम्यान माधवनने त्याच्या गच्चीवरील बागेची झलकही चाहत्यांना दाखवली होती. तिथे त्याने पिकवलेल्या ताज्या चेरी मोठ्या अभिमानाने सर्वांना दाखवल्या होत्या.
माधवनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने धुरंधर व धुरंधर २ मध्ये अजय सान्याल ही दमदार भूमिका करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक होत आहे.
