बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या काही वर्षांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ने सिनेसृष्टीत पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या प्रत्येक सिनेमागणिक अभिनयात निपुण होत चालली आहे. तिच्या अभिनयाचा अजून एक पैलू दाखवणारा राझी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेला ‘राझी’ हा सिनेमा म्हणजे सिनेप्रेमींसाठी पर्वणीच असेल यात काही शंका नाही.

२.२२ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये आलिया सहमत नावाच्या काश्मिरी मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. सहमत दिसायला अगदी साधीशी असली तरी फार चतूर असते. ट्रेलरमध्ये आलियाचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी (विक्की कौशल) लग्न होते. भारतातून पाकिस्तानात आलिया सून म्हणून जाते, पण तिचा मुळ उद्देश पाकिस्तानात जाऊन गुप्तहेरी करणं असतो. ती भारताचे डोळे आणि कान बनून पाकिस्तानात राहत असते.

हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर राझी सिनेमाची कथा बेतलेली आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. ट्रेलरमध्ये आलियाचे एक आज्ञाधारक मुलगी, कुटुंबवत्सल पत्नी आणि निर्भीड गुप्तहेर असे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. तर विक्की कौशलही त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये खुलून दिसतो.

सिमेवर देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा संपूर्ण देशाला सार्थ अभिमान असतो. पण जे स्वतःची ओळख लपवून देशासाठी काम करतात त्यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना काहीच माहित नसते. राझी सिनेमातून अशा अनसंग हिरोंचे असामान्य कतृत्व दाखवण्याच प्रयत्न करण्यात आला आहे. ‘फिलहाल’ आणि ‘तलवार’ सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या मेघना गुलझारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कश्मीर, पंजाब आणि मुंबईमध्ये झाले असून येत्या ११ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.