संतोष पवार यांच्या नाटकांच्या नावातच त्यात काय असेल, हे स्पष्ट होतं. ‘राधा ही कावरीबावरी’ या नावातून तुम्हाला जे ध्वनित होतं, तेच या नाटकात आहे. म्हणजे राधेची झालेली गोची आणि त्यातून तिची सोडवणूक करणारा कृष्ण! फक्त इथं राधा आणि कृष्ण या दोन्हीही व्यक्ती एकच आहेत, हाच काय तो फरक. तुम्ही म्हणाल, ‘हा काय चावटपणा? दोन्ही व्यक्ती एकच असतील तर मुळात अशी गोची होणंच शक्य नाहीए.’ खरंय तुमचं. पण नाटकात असं घडलंय खरं. कसं ते सांगतो..नेते बारीकराव पाटलांचा पीए राधाकृष्ण हा त्यांची मुलगी मीरा हिच्या प्रेमात पडलाय. पण बारीकरावांना आणि त्यांच्या खानदानाला- म्हणजे बायको केवडाबाई आणि मुलगा बबनरावांना- हे पसंत नाहीए. कुठे आपण आणि कुठं हा टिनपाट पीए! पण बारीकरावांचं तर राधाकृष्णाशिवाय पान हलत नाही. तथापि, प्रश्न खानदानाच्या इज्जतीचा असल्यानं सगळे एक होऊन राधाकृष्णाला ‘बऱ्या बोलानं मीरेचा नाद सोड, नाहीतर..’ म्हणत धमकावतात. पण प्रेमदीवाना राधाकृष्ण आणि मीरा त्यांना दाद देत नाहीत. असेच एकदा घरात कुणी नाही असं बघून राधाकृष्ण मीराला भेटायला तिच्या घरी येतो. दुर्दैवानं घरचे अचानक परत येतात आणि राधाकृष्ण व मीरा रंगेहात पकडले जातात. परंतु प्रसंगावधानी राधाकृष्ण स्त्रीवेष परिधान करून त्यांच्यासमोर येतो आणि आपण मीरेची मैत्रीण (आणि राधाकृष्णाची बहीण!) राधा असल्याची थाप ठोकून सुटका करून घेऊ पाहतो. ही थाप कशीबशी पचते; परंतु त्यातून एक वेगळंच संकट उभं राहतं. मीराच्या भावाला- बबनरावला राधा भयंकर आवडते आणि तो तिच्याशीच लग्न करण्याची आपली इच्छा बोलून दाखवतो. झालं! केवडाबाईलाही राधा पसंत पडते. आपला निकम्मा मुलगा तिच्यामुळे ताळ्यावर येईल असं तिला वाटतं. त्यामुळे ती लागलीच राधाला सून करून घ्यायचं मनावर घेते. तिथल्या तिथंच राधेला मागणी घालते.आगीतून सुटून भलत्याच फुफाटय़ात पडल्यानं राधाकृष्ण आणि मीरा हैराण होतात. आता या संकटातून कसं सुटायचं, असा प्रश्न कृष्णाला पडतो. यातून सुटण्याचा जो जो प्रयत्न तो करतो, त्यानं तो अधिकच खोलात जातो. या संकटातून शेवटी तो कसा बाहेर पडतो, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य.‘मोरूची मावशी’पासून ‘चाची ४२०’पर्यंत नको तितकं वापरल्यानं झिजून गुळगुळीत झालेल्या क्लृप्तीवर हेही नाटक बेतलेलं आहे. मात्र, ‘संतोष पवार मसाल्यां’ची म्हणून एक खासीयत प्रस्थापित झालेली आहेच. त्यात घोळवून साकारलेली ही फार्सिकल कॉमेडी दोन तास फुल्ल टाइमपास करते. उच्चभ्रूंना अपेक्षित अशी ही बुद्धिगम्य कॉमेडी नसणार, हे संतोष पवारांचं हे नाटक आहे म्हटल्यावर आपसूक समजून जायला हवं. ते आपला प्रेक्षक कोण आहे, हे चांगलंच जाणतात. आणि त्याला नेमकं काय आवडतं, हेही! तेव्हा डोकं बाजूला ठेवून हे नाटक पाह्य़लं तर छान टाइमपास होतो. प्रत्येक नाटकाकडून उच्च अभिरुचीची अपेक्षा करणं कधीही गैरच. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायानं हलकंफुलकं मनोरंजन हवं असलेले प्रेक्षकही असतातच. त्यांची निकड संतोष पवार शंभर टक्के आणि पैसावसूल भागवतात. या नाटकात काय नाही? नाच-गाणी, शारीर विनोद, कोटय़ा, पीजे, स्लॅपस्टिकची कसरत, लोकप्रिय गाण्यांचा चमचमीत मसाला.. संतोष पवार आपल्या प्रेक्षकांना रंजनाच्या कुठल्याही भुकेपासून वंचित ठेवत नाहीत. म्हणूनच ‘भीगे होठ तेरे’सारख्या गाण्यावरचा एक आचरट प्रसंगही यात आहे. साधारणत: कलाकार निवडतानाही नाटकातील पात्राच्या नावाच्या विरोधी व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार निवडायचा संतोष पवारांना सोस आहे. या नाटकातही भरत सावले (बारीकराव पाटील), किशोरी अंबिये (केवडाबाई), रामदास मुंजाळ (बबनराव) अशी चपखल विसंगत पात्रयोजना आहे. या प्रत्येकाच्या शारीर वैशिष्टय़ांचा विनोदनिर्मितीसाठी वापर करण्यात त्यांनी कुठलीही हयगय केलेली नाही. कसंही का होईना, प्रेक्षकांचं मनोरंजन हाच त्यांचा धंदा असल्यानं त्यांना ते माफ आहे. आणि संतोष पवारांचं नाटक पाहायला गेल्यावर एकदा का मेंदूला विश्रांती दिली, की नाटकात काहीही खटकत नाही. ‘स्वस्त करमणूक’ वगैरे शिक्का मारून त्यांना हिणवायचंही कारण उरत नाही. हीसुद्धा काहींची गरज असू शकते. नव्हे, असतेच. तेव्हा महत्त्वाचं काय? तर टाइमपास होतो की नाही, हे! तो होतो! मग बाकीच्या उठाठेवी हव्यात कशाला? संतोष पवार यांनी स्वत: साकारलेली राधा आणि कृष्णाची भूमिका हा या नाटकाचा ‘यूएसपी’ आहे. विशेषत: त्यांची राधा भयंकर लोभस आहे. आजवर अनेक कलाकार स्त्रीभूमिकेत उभे राहिलेले आहेत. अगदी बालगंधर्वापासून प्रसाद ओक, मोहन जोशींपर्यंत. त्यात दिलीप प्रभावळकरांसारखा एखाद् दुसरा अपवाद करता स्त्रीभूमिकेत स्त्रीच्या नजाकतीनं ‘स्त्रीत्व’ आविष्कृत करणं कुणालाही जमलेलं नाही. कुणी स्त्रीसारखा ‘नाजूक’ दिसला, तरी एकदा का त्यानं तोंड उघडलं, की माती खाल्लीच म्हणून समजा. एखाद्याला स्त्रीआवाजात संवाद म्हणणं जमतं, पण तो ‘स्त्री’ म्हणून आपल्या पचनी पडत नाही. पण ‘राधा ही कावरीबावरी’मध्ये संतोष पवारांची राधा (एखादा प्रसंग अपवाद!) ही अस्सल स्त्रीच वाटते. स्त्रियांसारख्या हालचाली, ग्रेसफुल वावरणं, उठणं-बसणं.. गाण्यांवर केलेली नृत्य-अदाकारी.. संतोष पवारांनी हे इतक्या ग्रेसफुली केलंय, की त्याकरता त्यांना हजार गुन्हे माफ! एक पुरुष स्त्रीभूमिका साकारतोय, हे क्षणभर आपण विसरून जातो. हॅट्स ऑफ! किशोरी अंबिये यांची तर चतुरस्र अभिनेत्री म्हणूनच ओळख आहे. त्यांचा कॉमेडीचा सेन्स, नृत्यावरची हुकूमत आणि संवादफेकीचं टायमिंग लाजवाब. केवडाबाईच्या थिल्लरगिरीबरोबरच भावनोत्कट प्रसंगही त्या तितक्याच तन्मयतेनं वठवतात. ‘बारीकराव’ या नावाशी विसंगत व्यक्तित्व असलेल्या भरत सावलेंनी आपल्या ढेरीचा आणि टक्कलाचा हशे वसूल करण्यासाठी पुरेपूर वापर केला आहे. रामदास मुंजाळ यांनी बबनरावचं बालसुलभ बागडणं छान एन्जॉय केलं आहे. निरागस, वांड घोडनवरा त्यांनी धमाल रंगवलाय. प्रशांत शेटे यांचा छपरी गजरेवाला लक्षवेधी आहे. चैत्राली रोडे यांनीही राधाकृष्णाच्या आईचं अर्कचित्र मस्त रंगवलंय. ज्ञानेश पालव (फोटोग्राफर) आणि श्वेता अंधारे (मीरा) यांचीही त्यांना छान साथ लाभलीय. तांत्रिक बाबींत फारसं काही उल्लेखनीय नाही. संदेश बेंद्रे यांनी उभ्या केलेल्या बारीकरावांच्या घराचे दरवाजे लागता लागत नाहीत. त्यामुळे कलाकारांचा आणि प्रेक्षकांचाही रसभंग होतो. अनेक प्रसंगांतली गंमत त्यामुळे उणावते. असो. एकुणात, संतोष पवार आणि किशोरी अंबिये यांच्या अभिनय जुगलबंदीसाठी तरी हे नाटक एकदा पाहायला काहीच हरकत नाही.