Radhika Apte Talks About Working Hours : राधिका आपटे मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. राधिका तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमी इंडस्ट्रीबद्दलची तिची मतं, अनुभव स्पष्टपणे मांडत असते. अशातच आता तिनं इंडस्ट्रीतील कामाच्या तासांबद्दलची तिची प्रतिक्रिया, निर्णय याबद्दल सांगितलं आहे.
अनेकदा अभिनेत्री त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर अभिनयातून ब्रेक घेतात; तर काही अभिनेत्री मोजक्याच कलाकृतींमधून दिसतात. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनं तिच्या मुलीच्या जन्मानंतर दिवसाला फक्त आठ तास काम करणार, अशी मागणी केलेली. तिची ही मागणी दिग्दर्शकाला मान्य नसल्यानं अभिनेत्रीनं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संदीप रेड्डी वांगा आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाल्याचंही म्हटलं गेलं.
अशातच आता राधिका आपटेनंही कामाच्या तासांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिनं दिवसाला फक्त १२ तास काम करणार असल्याचं म्हटलं आहे. २०२४ मध्ये मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेनं पुन्हा कामावर परतण्याचा निर्णय घेतला. सध्या ती तिच्या ‘रात अकेली है’ व ‘साली मोहोबत्त’ या ओटीटीवरील चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
राधिका आपटेने घेतला ‘हा’ निर्णय
‘फिल्मफेअर’शी संवाद साधताना राधिकाला इंडस्ट्रीत कोणत्या गोष्टीत बदल करायला आवडेल, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी सगळ्यात आधी कामाचे तास बदलेन. तुम्ही कोणाकडूनही ते त्यांच्या मुलांपासून एक आठवडा दूर राहतील. अशी अपेक्षा नाही करू शकत. मी जास्त मोठ्या तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर अनेक वादविवाद झाले. तुम्ही एकूण हैराण व्हाल की, यासाठी मला भांडावं लागलं. मला हे खूप विचित्र वाटतं आणि लोक म्हणतात की, तुम्ही बाळासाठी नॅनी ठेवा आणि त्यांना सेटवर घेऊन या; पण हा त्यावरचा उपाय नाहीये.”
राधिकानं घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं, “मी आठवड्याते पाच दिवस १२ तास काम करणार. त्यामध्ये माझ्या प्रवासाचे तास, मेकअप वगैरे गोष्टींचा समावेश आहे. मी आता माझ्या मतावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि अनेकांना ते आवडत नाहीये.” राधिका पुढे म्हणाली, “मी वीकली ऑफला महत्त्व देते आणि आठवड्यातून पाच दिवसांपेक्षा जास्त काम मला करायचं नाहीये. जर एखादी छोटी फिल्म असेल आणि त्यासाठी अधिक तास काम करणं खरंच अवश्यक असेल, तर ते अपवाद ठरतं. नाही तर मला १२ तासांपेक्षा अधिक काम करायचं नाहीये.”
