रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा येत्या जुलै महिन्यात थाटामाटात पार पडणार आहे. या भव्य सोहळ्याला बॉलीवूडमधील असंख्य कलाकार आणि काही परदेशी पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नाआधी अनंत-राधिकाच्या दोन्ही प्री-वेडिंग सोहळ्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे या जोडप्याचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान, आमिर, माधुरी या कलाकारांपासून ते हॉलीवूड गायिका रिहानापर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यानंतर मे महिन्यात अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये क्रुझवर पार पडला होता. यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी इटलीमध्ये खास लक्झरी क्रुझ बूक करण्यात आली होती. क्रुझवरच्या भव्य सोहळ्यामधील फोटो नुकतेच राधिका मर्चंटने वोगला दिलेल्या मुलाखतीत शेअर केले आहेत. चार दिवस क्रुझवर कशाप्रकारे सेलिब्रेशन करण्यात आलं याचा खुलासा देखील अंबानींच्या होणाऱ्या सुनेने केला आहे.

हेही वाचा : Video : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची क्रेझ! ‘धर्मवीर’ फेम अभिनेत्याचा समुद्रकिनाऱ्यावर ‘अंगारो सा’ गाण्यावर जबरदस्त डान्स

राधिका वोगला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “आमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांसाठी हा सोहळा खूप जास्त स्पेशल होता. अंबानी व मर्चंट कुटुंबाचे काही नातेवाईक आणि मित्रमंडळी जगाच्या विविध कानाकोपऱ्यात राहतात. काही कारणास्तव ही मंडळी जामनगरला उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळेच आम्ही दुसरा प्री-वेडिंग सोहळा युरोपमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला.”

राधिका मर्चंटने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनन्या पांडे, शनाया कपूर, करिश्मा कपूर, मनीष मल्होत्रा, करण जोहर, पुनीत मल्होत्रा, ओरी, जान्हवी कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया यांची झलक पाहायला मिळत आहे. क्रुझवर राधिकाने रॉबर्ट वुनने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. या गाऊनवर अनंतने तिला वयाच्या २२ व्या वर्षी लिहिलेलं प्रेमपत्र छापण्यात आलं होतं. याशिवाय एका फोटोमध्ये राधिका तिची होणारी नणंद ईशा अंबानीसह मनसोक्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ चित्रपटात छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कोण साकारणार? अखेर नावं आली समोर

दरम्यान, पुढील काही आठवड्यांमध्ये अंबानींच्या घरी पारंपरिक संगीत आणि काही पूजा केल्या जातील असंही राधिकाने सांगितलं. हे स्टार जोडपं येत्या १२ जुलैला मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहे.