अभिनेता शाहरुख खानने त्याचे बरेच आयुष्य मुंबईच्या झगमगाटात व्यतीत केले असले तरीही तो मुळचा दिल्लीचा आहे ही बाब नाकारता येणार नाही. बॉलिवूडच्या किंग खानला आजही दिल्लीबद्दल प्रचंड आकर्षण वाटते आणि दिल्लीतील अनोखा पंजाबी अंदाजही त्याच्या वागण्याबोलण्यातून पाहायला मिळतो. ‘रईस’ चित्रपटामुळे सर्वत्र शाहरुखच्याच नावाची चर्चा सुरु असतानाच किंग खानने दिल्ली गाठली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो दिल्लीला गेला होता. त्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाहरुखने सैन्यदलातील जवानांसोबत त्याचा आनंद साजरा केला. यावेळी भांगडा सादर करणाऱ्यांसोबत शाहरुखनेही ताल धरल्याचे पाहायला मिळाले.

१२४ इंफॅन्ट्री शीख बटालियनमधील जवानांच्या साथीने शाहरुख चक्क ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर नाचला. त्यावेळी शाहरुख आणि जवानांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. दिलखुलास जगणे, धम्माल करणे आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेणे असाच काहीसा बाज पंजाबी समाजामध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या या अंदाजातच शाहरुखनेही सहभागी होत ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले. हे व्हिडिओ शेअर करताना त्याने ‘जवानांसोबत मी हा प्रजासत्ताक दिन अस्सल पंजाबी पद्धतीने साजरा करत आहे’, असे कॅप्शनही लिहिले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाहरुख त्याच्या ‘रईस’ या चित्रपटाचे शक्य त्या सर्व परिंनी प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. ‘रईस’ हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून चित्रपटगृह आणि चाहत्यांमध्येही या ‘रईस’ अभिनेत्याविषयीच्याच चर्चा रंगत आहेत.

राहुल ढोलकिया दिग्दर्शित हा चित्रपट देशभरातील दवळपास ८०% चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. शाहरुखसोबतच या चित्रपटातील सहकलाकारांच्या भूमिकाही अनेकांच्याच पसंतीस येत आहेत. अतुल कुलकर्णी, उदय टिकेकर, मोहम्मद झिशान आयुब, शिबा चड्ढा यांच्या भूमिकाही अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. दरम्यान, ‘रईस’नंतर किंग खान इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि अनुष्का शर्मा ही जोडी स्क्रिन शेअर करणार आहे.

वाचा: सलग तीन सिनेमात साकारलेल्या मुस्लिम व्यक्तिरेखेबाबत शाहरुख म्हणतो…