‘परझानिया’सारखा चित्रपट देणारा दिग्दर्शक राहुल ढोलकिया जेव्हा गुजरातमधल्या अवैध दारूचा धंदा करणाऱ्या आणि आपलं साम्राज्य उभारणाऱ्या कोणा एका अब्दुल लतिफ नावाच्या माफियाची कथा सांगतो आहे म्हटल्यावर त्यात नक्कीच काहीतरी वेगळं असणार ही सर्वसामान्य अपेक्षा असते. आणि हा चित्रपट त्या अपेक्षेवर खराही उतरतो. हा चित्रपट लतिफच्या आयुष्यावर नाही असा दावा चित्रपटकर्त्यांनी केला असला तरी ‘रईस’ नावाने समोर येणारी कथा त्याच्या बाबतीत घडलेल्या घटनांचाच मागोवा घेताना दिसते. एका अर्थाने ‘रईस’ ही वृत्ती म्हणून चित्रपटातून समोर येते.

गुजरातमध्ये दारूविक्रीवर असलेली बंदी आणि त्याच राज्यात सर्वाधिक दारू विकलं जाणं हा विरोधाभास पुढे ठेवत दिग्दर्शक आपल्याला फतेहपुरात घेऊन जातो. कुठलाही धंदा छोटा नसतो आणि धंद्यापेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही, हे आईच्या तोंडून निघालेले उद्गार प्रमाण मानून लहानगा रईस त्याच्या त्या नकळत्या वयात दारूविक्रीच्या धंद्यात उतरतो. रईसचा हा लहानपणापासूनचा प्रवास, त्याचं या धंद्याशी असलेलं नातं आणि मग बनिए का दिमाग. मियाँभाई की डेअिरग म्हणून स्वत:चा धंदा सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न पाहायला मिळतात. या पहिल्याच मोठय़ा भागात दिग्दर्शकाने ऐंशी ते नव्वदच्या दशकातील गुजरात हुबेहूब उभं केलं आहे. दोन समांतर पातळीवर या चित्रपटाची गोष्ट सुरू राहते. एकीकडे ज्या शेठकडे नोकरी करत रईस (शाहरूख खान) मोठा झाला, त्यांच्याच बरोबरीने स्वत:चा धंदा सुरू करावा ही इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला मिळालेली वागणूक एकीकडे आणि दुसरीकडे त्याचा हा अवैध धंदा बंद व्हावा, यासाठी त्याच्या पाठी हात धुऊन लागलेल्या पोलीस अधिकारी जयदीप मजमुदार (नवाजुद्दीन सिद्दीकी) याचा ससेमिरा.. या दोन पातळीवर रईसचा धंदा टिकवण्यासाठीचा संघर्ष सुरू राहतो. ‘रईस’ची कथा फार वेगळी नाही. मात्र चित्रपटाचा काळ आणि गुजरातचा त्याला असलेला संदर्भ या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दिग्दर्शकानं केलेली वेगळी मांडणी चित्रपटाला वेगळेपणा देते.

बॉलीवूडच्या नेहमीच्या माफिया किंवा गँगवॉरपटांप्रमाणे रईसची व्यक्तिरेखा प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट या पद्धतीप्रमाणे दिग्दर्शकाने रंगवलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या प्रोमोजमध्ये जरी रईसच्या तोंडी डायलॉगबाजी असली तरी प्रत्यक्षात चित्रपटात ते रईसच्या तोंडी येत नाहीत. रईस हा शेवटपर्यंत आपला धंदा उभारण्यासाठी, टिकवण्यासाठी धडपडणारा माफिया म्हणूनच चित्रपटात दिसतो. हेच चित्रपटाचे खरे यश आहे, असं म्हणता येईल. रईसऐवजी सगळी स्टाईल आणि संवादफेक मजमुदार अर्थात नवाजच्या वाटय़ाला आले आहे. नवाजने मजमुदारची व्यक्तिरेखा इतक्या सहज आणि त्याच्या पद्धतीने कमाल रंगवली आहे की त्याच्या तोंडचे संवाद, त्याची देहबोली या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. या चित्रपटात शाहरूखऐवजी नवाज भाव खाऊन जातो. ‘रईस’ म्हणून शाहरूखने आपल्या व्यक्तिरेखेला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे. तरुणपण आणि थोडासा प्रौढ रईस त्याला साकारायचा असल्याने त्याच्या लुकच्या मदतीने त्याने हा फरक सहजी रंगवला आहे. सोनेरी काडय़ांचा चष्मा, पठाणी पेहराव, डोळ्यात सुरमा या लुकमधील रईस ही शाहरूखच्या आजवरच्या कारकिर्दीतील अत्यंत वेगळी अशी भूमिका आहे. रईसच्या मनातील राग आणि प्रामाणिकपणे धंदा करून आपलं वेगळं जग उभारण्याचे स्वप्न पाहणारा, पोलीस आणि आपल्याच लोकांच्या कारवायांमुळे हताश झालेला रईस असे खूप चांगले क्षण शाहरूखने या चित्रपटात दिले आहेत. त्याला त्याच्या मित्राच्या सादिकच्या भूमिकेत झीशान अय्यूबची चांगली साथ मिळाली आहे. रईसच्या पत्नीच्या भूमिकेत माहिरा खानचा चेहरा वेगळा वाटतो. मात्र तिला या चित्रपटात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. अतुल कुलकर्णीने साकारलेला शेठ आणि नरेंद्र झा यांचा मुसा या दोन्ही व्यक्तिरेखा लक्षात राहतात. शेठचा रईसबरोबरचा अखेरचा क्षणही अतुल कुलकर्णी आणि शाहरूख खान यांच्या नजरेतून अस्सल रंगला आहे.  मजमुदार म्हणजेच नवाजच्या तोंडून रईसची कथा सांगण्याची दिग्दर्शकाची खेळीही यशस्वी ठरली आहे. एका सूत्रात बांधलेल्या या चित्रपटातून दिग्दर्शक राहुल ढोलिकयाने आपली आजवर वेगळ्या वाटेने जाण्याची क्षमता पुन्हा एकवार सिद्ध केली आहे. शाहरूखसारख्या मोठय़ा कलाकाराला घेऊन व्यावसायिकतेची सारी गणितं बाजूला सारून आपल्या पद्धतीचा चित्रपट देणं ही किमया या पहिल्याच मोठय़ा चित्रपटातून राहुल ढोलकियाने साधली आहे.