शाहरुखसोबत सिनेमाचे प्रमोशन करणे हा माझा अधिकार- माहिरा खान

शाहरुखसोबत काम केल्यानंतर अनेकांच्या करिअरला उभारी मिळते पण

शाहरुख खानसोबत काम करणे हे तर प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्यात अभिनेत्रींना त्याच्यासोबत काम करायला मिळाले तर त्यांच्यासाठी गगन ठेंगणेच होईल यात काही शंका नाही. माहिरा खान यावेळी शाहरुख खानसोबत काम केलेल्या त्या अभिनेत्रींपेक्षा स्वतःला कमी मानत नसेलच. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सध्या आनंदाच्या शिखरावर आहे. रईस या शाहरुखच्या आगामी सिनेमात ती शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. उद्या हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

atid-fawad-and-mahira-759

या सिनेमाकडून जेवढ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. तेवढ्याच किंबहूना त्याहून जास्तच अपेक्षा माहिराच्या या सिनेमापासून आहेत. पण मध्यंतरी घडलेल्या घडामोडींमुळे तिला या सिनेमाचा भाग होता आला नव्हता. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये इच्छा असूनही तिला सहभागी होता येत नव्हते.
जिंदगी या वाहिनीवर येणाऱ्या हमसफर या मालिकेमुळे माहिराची लोकप्रियता भारतात वाढली आहे. भारतात या सिनेमाचे प्रमोशन करायला तिला बंदी घालण्यात आली असली तरी ती मात्र तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतेय.
डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत तिने या सिनेमाबद्दलची आपली मतं मांडली.

mahira-raees

पाकिस्तानमध्ये रईस सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यामुळे तिला वाईट वाटल्याचे तिने सांगितले. या मुलाखतीत ती म्हणाली की, माझ्या देशाने हा सिनेमा पाहावा असे मला नेहमीच वाटते. जगातल्या प्रत्येक माणसाने हा सिनेमा पाहावा असेच मला वाटते. मला जे शक्य होते ते मी केले, आता माझ्या हातात काही नाही असे माझे मित्र मला सतत सांगतात. पण तरीही मला सगळ्यांना सांगावेसे वाटते की प्रत्येकाने हा सिनेमा पाहावा. गेल्या दोन वर्षांपासून या सिनेमासाठी मी फार कष्ट घेतले, फार घाम आणि अश्रूही गाळले. त्यामुळेच यात जरी मी अयशस्वी ठरले तरी लोकांनी हा सिनेमा पाहावा असे मला वाटते. पण या दोन वर्षात मी हेही शिकले की काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. तुम्ही एखादे दृश्य चित्रित करता, काही दृश्य सिनेमात नंतरही जोडता येतात. पण असे असले तरी काही गोष्टी या तुमच्या हातात नसतात. असे असले तरी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होण्याची मी फार वाट बघत आहे.

माहिराने यावेळी इतर पाकिस्तानी कलाकारांचाही उल्लेख करत म्हटले की, उरी हल्ल्यांनंतर घडलेल्या घडामोडींची झळ फवाद खान आणि अली जाफर यांनाही पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडल्यामुळे त्यांनाही त्यांची भविष्यातली कामे अर्ध्यावर सोडून यावे लागले. हे खरे त्रासदायक आहे.

या बंदीमुळे अनेक गोष्टी अचानक बदलल्या गेल्या. सहा महिन्यांपूर्वी मी दररोज सिनेमांच्या संहिता वाचत होते. तर आता सहा महिन्यांनंतर प्रत्येक निर्माता मला हेच सांगत आहे की इथे काहीच होऊ शकत नाही. आता नाटकांकडेच वळावं लागेल. भारतात रईसचे एवढे मोठे प्रमोशन करु न शकल्याचे दुःखही तिने यावेळी बोलून दाखवले. मी पाकिस्तानमध्ये परतत होते आणि भारतात सिनेमातले गाणे प्रदर्शित झाले होते. मला प्रत्येकजण या गाण्याबद्दल मेसेज करुन सांगत होता. ते वाचताना मला माझे अश्रू आवरत नव्हते. माझे निर्माते रितेश सिधवानी आणि दिग्दर्शक राहूल ढोलकिया यांनी या दोन वर्षात मला खूप मदत केली.

शाहरुखसोबत काम केल्याबद्दल माहिरा म्हणाली की, तो खरंच एक जादूगार आहे. त्याने मला बिघडवले. तो प्रत्येकवेळा मला तू असं कर, तू हे कर असंच सांगायचा. एकदा मी न राहून त्याला विचारले की, मी बरोबर करत नाहीये का? यावर तो म्हणाला की, मी माझ्या अनुभवावरुन काय करावं ते सांगतोय. तु तुझ्या पद्धतीने कर. पण नंतर स्वतःला स्क्रीनवर पाहिल्यानंतर मी तुला हे का नाही सांगितलं असं तुला वाटू नये एवढंच मला वाटतं. हे सोडले तर तो खूप हुशार आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही, ज्याबद्दल तुम्ही त्याच्याशी बोलू शकत नाही. त्याला सर्व माहित आहे.

आम्ही खूप गोष्टींवर चर्चा करायचो. सिनेमांव्यतिरिक्त ही तो कोणत्याही गोष्टींवर बोलू शकतो. मी नेहमीच त्याची चाहती होते. शाहरुखसोबत काम केल्यानंतर अनेकांच्या करिअरला उभारी मिळते. पण माहिराच्याबाबती मात्र उलटेच झाले. किंग खानसोबत काम करण्याचे तिचे स्वप्न साकार झाले असले तरी तिच्या करिअरने मात्र वेगळीच कलाटणी घेतली.

शाहरुख खानसोबत या सिनेमाचे प्रमोशन करणे हा माझा अधिकार आहे. हा सिनेमा माझाही तेवढाच आहे. सिनेमाचे प्रमोशन करायला द्या. ही मागणी फार जास्त वाटते का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raees shah rukh khan co star mahira khan interview