Rahul Gandhi on The Kerala Story 2: अत्यंत वादग्रस्त ठरलेला ‘द केरला स्टोरी २’ हा चित्रपट अखेर गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या सिनेमाचा पहिला भाग २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा पहिल्या भागासारखीच आहे. द केरला स्टोरी त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा नववा हिंदी चित्रपट ठरला होता. मात्र, दुसऱ्या भागाला पहिल्या आठवड्यात फक्त २५.४ कोटी रुपयांची कमाई करता आली आहे. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय. अनेक राजकीय नेत्यांनीही या चित्रपटावर टीका केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या सिनेमाला द्वेष पसरवणारा म्हटलं होतं. आता संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘कोणीच द केरला स्टोरी २ पाहत नाहीये’
अलीकडेच राहुल गांधींनी काही मुलांशी संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना द केरला स्टोरी २ या चित्रपटाबद्दल त्यांचं मत विचारलं. “लोकांचे मत बदलण्यासाठी चित्रपट हे राजकीय प्रचाराचे साधन बनले आहे का?” असा प्रश्न त्या विद्यार्थ्याने विचारला. उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “चांगली गोष्ट ही आहे की ‘द केरला स्टोरी’चे थिएटर रिकामे दिसत आहेत आणि कोणीही तो चित्रपट पाहत नाहीये. यावरून हेच दिसून येतंय की या देशातील बहुसंख्य लोकांना केरळ, तेथील परंपरा आणि संस्कृती काय आहे, याबद्दल चांगली माहिती आहे.”
सिनेमाचा वापर लोकांना बदनाम करण्यासाठी केला जातो – राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले, “पण तुम्ही अगदी बरोबर बोललात. चित्रपट, टीव्ही आणि माध्यमांचा वापर आता एक हत्यार म्हणून केला जात आहे. लोकांना बदनाम करण्यासाठी, समाजात फूट पाडण्यासाठी याचा वापर केला जात आहे, जेणेकरून काही ठराविक लोकांना फायदा व्हावा आणि इतरांचं नुकसान व्हावं. मला वाटतंय की भारतात आता हे प्रमाण खूप वाढलंय. जर एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचा चित्रपट बनवायचा असेल, माध्यमांमध्ये काही बोलायचं असेल किंवा ठराविक विचारांची बाजू घ्यायची असेल तर त्यांच्यावर हल्ले केले जातात, त्यांना बोलू दिलं जात नाही. मीही हेच अनुभवतोय.”
काही ठराविक गोष्टींना हेतुपुरस्सर प्रोत्साहन दिलं जातंय, असंही मत राहुल गांधींनी मांलं. “दुसरीकडे, काही ठराविक विचार खूप पसरवले जातात, पण त्यांना काहीच होत नाही. हे देशासाठी अत्यंत घातक आहे आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहे. भारतात हे सर्व घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले होते केरळचे मुख्यमंत्री?
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही द केरला स्टोरी २ बद्दल काळजी व्यक्त केली होती. हा चित्रपट केरळविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या हेतूने बनवलेला आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. “केरळविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी आणि आपल्या धर्मनिरपेक्ष परंपरांचा अपमान करण्यासाठी ‘द केरला स्टोरी २’ बनवण्यात आला आहे. हा प्रदर्शित होणं ही गांभीर्याची बाब आहे,” असं विजयन म्हणाले होते.
