राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला. राजकीय वर्तुळासह अनेक क्षेत्रातून या निर्णयाला विरोध झाला होता. परिणामी सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. सरकारच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आधीपासूनच विरोधात होती.
या निर्णयाविरुद्ध त्यांनी मोर्चाची घोषणादेखील केली होती. मात्र सरकारने जीआर स्रर करताच मोर्चा रद्द केला. राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा आदेश रद्द केल्यानंतर आज (५ जुलै) ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा साजरा झाला.
या विजयी मेळाव्यानिमित्त तब्बल दोन दशकांनंतर उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच नाही तर त्यांची अमित आणि आदित्य ठाकरेसुद्धा एकाच मंचावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच आदित्य आणि अमित यांचे आजच्या कार्यक्रमातील अनेक फोटो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या दोघांनी एकत्र यावे अशी अनेकांची इच्छा होती आणि ती इच्छा आजच्या मेळाव्याच्यानिमित्ताने पूर्ण झाल्याबद्दल मराठी माणसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सामान्य जनतेसह मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांनीदेखील दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हेमांही कवीने इन्स्टाग्राम स्टोरीवर उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो शेअर करत “इतिहास थांबतो आणि एक फोटो घेतो. हा क्षण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. दशकातील एक सुंदर फोटो” असं म्हटलं आहे.

अभिनेत्री रुचिरा जाधव हिनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. रुचिराने आदित्य आणि अमित यांचा व्हिडीओ शेअर करत “माहीत नाही का? पण हा व्हिडीओ पाहून मला खूप छान वाटत आहे. मराठीतच बोलेन. बाकी भाषांचा आदर आहेच. पण मराठी नामशेष होऊ देणार नाही. रुचिरा सेस उगाच जबरदस्ती नको” असंही म्हटलं आहे.

तसंच शिवानी सुर्वेनेही राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो शेअर करत जय महाराष्ट्र असं लिहिलं आहे. त्याचबरोबर ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवार, प्रथमेश परब यांनीही सोशल मीडियावर आजच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यांच्याशिवाय किरण माने यांनीही मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.