Kiran Mane Share Post : राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा आदेश रद्द केल्यानंतर आज (५ जुलै) ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा साजरा झाला. यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू जवळपास १९ वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसले.
राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. सक्तीची हिंदी नको म्हणत या सर्व कलाकारांनी मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेतली होती. अशातच आजच्या विजयी मेळाव्याबद्दलही काही कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या मराठी विजयी मेळाव्यात तेजस्विनी पंडीत, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या मेळाव्याबद्दल प्रतिक्रिया दिली. अशातच किरण माने यांनीसुद्धा आजच्या विजयी मेळाव्याबद्दल मोजक्या शब्दांत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
किरण माने फेसबुक पोस्ट
किरण माने यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, “अनाजीपंता, कितीबी आग लाव, जळनार नाय… हा महाराष्ट्र तुला कळनार नाय…” या पोस्टसह किरण मानेंनी ‘एकजूट’ असा हॅश्टॅगही लिहिला आहे.
किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी “ठाकरे हाच ब्रॅंड”, “आता खरी मजा येणार”, “सोनेरी क्षण”, “महाराष्ट्र धर्माची एकजूट” अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी “आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी” मत व्यक्त केलं.