मराठी चित्रपटांसाठी यावर्षाची सुरुवात दणक्यात झाली होती. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा हेमंत ढोमे दिग्दर्शित चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाने ३२ कोटींची कमाई करत यशाची पहिली झुळूक दिली होती. त्यानंतर चार महिन्यांनी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या यशानेही पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला आनंदाचा धक्का दिला आहे. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने ५७.७० कोटी रुपयांचा टप्पा पार करत यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे.

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे थोरले बंधू संभाजी राजे यांच्यातील बंधूप्रेम, स्वराज्यनिर्मितीच्या ध्यासाने पेटून उठलेल्या महाराजांचे शौर्य, त्यांची युद्धनीती, अफझलखानाचा वध हा इतिहास भव्य स्वरूपात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळतो आहे. हिंदी आणि मराठीत एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला होता. आठवड्याभरात या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे.

मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान ‘राजा शिवाजी’ने मिळवले आहे. आत्तापर्यंत ‘सैराट’, ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’ या चित्रपटांची सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये गणना होते. ‘सैराट’ने ११० कोटींची कमाई केली आहे, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने ९२ कोटी तर रितेश देशमुख यांचेच दिग्दर्शन असलेल्या ‘वेड’ चित्रपटाने ७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनीही ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवड्यातच ५० कोटींहून अधिक कमाई केल्याबद्दल चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता पुढच्या आठवड्यात हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ‘वेड’ चित्रपटाला मागे टाकत आणखी नवा विक्रम नोंदवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.