शिवकालीन इतिहासाचे एकेक पान आपापल्या शैलीत रंगवून सांगण्याचा प्रयत्न गेली काही वर्ष सातत्याने मराठी चित्रपटांच्या माध्यमातून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांची युध्दनीती, या जाणत्या राजाच्या अतुलनीय शौर्यगाथा एकेका चित्रपटातून क्वचित एकाच घटनेवर केलेल्या दोन-दोन चित्रपटातूनही अनुभवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराजांची गोष्ट उलगडायची तर कथा सांगणार्‍याचे कौशल्य आणि तो ज्या माध्यमातून ते सांगणार आहे त्याच्यावरची पकड या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पोटी जन्मलेले शिवबा ते रयतेचा राजा हा प्रवास उलगडून दाखवताना दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी काहीएक निश्चित विचाराने त्याची मांडणी केली आहे, त्यामुळे परिचित असूनही थोडा वेगळेपणा त्यात जाणवतो. पण, अनेकदा भव्यदिव्य कलाकृती करण्याच्या नादात त्यातलं नेमकं मर्म उलगडण्यात कसर राहते. मांडणी – तंत्रातली भव्यता अनेकदा आशय हरवून बसते, अशी काहीशी जाणीव ‘राजा शिवाजी’ पाहताना येते.

‘राजा शिवाजी’ ही कलाकृती मराठी आणि हिंदीतही विविध अर्थाने महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट इतक्या भव्य प्रमाणात मराठी आणि हिंदीत रुपेरी पडद्यावर सादर करत सर्वदूर पोहोचवणंही गरजेचं होतं. ते धाडस निर्माता, लेखक-दिग्दर्शक म्हणून रितेश विलासराव देशमुख यांनी केलं, त्यासाठी त्याचं कौतुक आहे. त्यातही हिंदीतील नामांकित कलाकारांबरोबर मराठीतील उत्तम कलाकारांना एकत्र आणून एक उत्तम ऐतिहासिकपट साकारण्यासाठीची त्यांची धडपड लक्षात घेण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या परिस्थितीत झाला ते स्वराज्यनिर्मितीच्या धगधगत्या ध्येयाची ठिणगी त्यांच्या मनात नेमकी कशी पेटली, या प्रवासावर हा चित्रपट अधिक भाष्य करतो. इथे केवळ एका जाणत्या राजाच्या आयुष्याचा प्रवास नाही. त्यांचे वडिल शहाजीराजे भोसले यांच्या मनाची दोलायमान स्थिती, आपल्याच मातीत आपण कुठल्या ना कुठल्या परकीय आक्रमकांची चाकरी करत अडकलो आहोत ही त्यांच्या मनातली असहाय्यतेची टोचणी, एक कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या घरच्यांच्या सुरक्षिततेचा विचार महत्त्वाचा की स्वराज्यासाठी निजामशाही, आदिलशाहीला झुगारून बंड पुकारायचं ही त्यांच्या मनातली घालमेल दिसते. दुसरीकडे सिंदखेडमध्ये निजामाने आपले वडिल, बंधू सगळ्यांची हत्या करून घर उजाडल्याने पेटून उठलेल्या जिजाऊ, या पार्श्वभूमीवर शहाजीराजे आणि जिजाऊ या उभयतांमध्ये घडणारा संवाद ही कुटुंबाची गोष्ट चित्रपटाच्या पूर्वार्धात पाहायला मिळते. शिवाजी महाराज आणि त्यांचे वडीलबंधू संभाजीराजे यांच्यातील नाते, परिस्थितीमुळे संभाजी आणि शिवाजी राजे यांच्यात आलेला दुरावा, संभाजीराजांचा आक्रमक स्वभाव, स्वराज्याच्या उभारणीसाठी धीटाईने शिवाजी राजे मोहिमा आखत असताना त्यांचे वडिल आणि बंधू यांची भूमिका नेमकी काय होती, याची काही प्रमाणात झलक या चित्रपटात पाहायला मिळते. उत्तरार्ध हा अफझल खान वधाच्या प्रसंगाने व्यापलेला आहे. चित्रपटाची संपूर्ण मांडणी ही साध्या-सरळसोट पध्दतीची किंवा एकरेषीय आहे असं म्हणता येईल. एकूण आठ प्रकरणांमधून हा चित्रपट उलगडत जातो.

या चित्रपटातला भव्यपणा हा नाकारता येणारा नाही, मात्र त्या तुलनेत जिथे जिथे ऐतिहासिक कथानकाची गरज म्हणून व्हीएफएक्सचा वापर केला जातो तिथे तिथे हा दर्जा राखता आलेला नाही. अफझलखानाच्या क्रौर्याची परिसीमा दाखवण्यासाठी घेतलेला दोन हत्तींच्या झुंजीच्या प्रसंगातील सुमार व्हीएफएक्स अजिबात दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही. शिवाजी राजांचा वावर ज्या किल्ल्यांमध्ये दाखवला आहे तो प्रतापगड आणि राजगडही पुरेशा प्रभावीपणे पडद्यावर दिसत नाहीत. ऐतिहासिक काळाची दृश्यनिर्मिती करताना काहीएक तंत्राचा आधार घ्यावा लागतो, जेणेकरून तो काळ जिवंत वाटेल. मात्र, तसं इथे काही होत नाही. त्या तुलनेत यातील काही युध्दाच्या प्रसंगांची मांडणी उत्तम झाली आहे. विशेषत: जावळीत चंद्रकांत मोरेंवरच्या हल्ल्यादरम्यानचा प्रसंग उत्तम वठला आहे. महाराजांबरोबर असणारे त्यांचे महत्त्वाचे मावळे, सरदार त्यांच्यामागे दिसतात, मात्र त्यात बहिर्जी वगळता बाकी कोण याचा काही दाखला मिळत नाही. चित्रपटाची पटकथा आणि मांडणी बांधेसूद करण्यावर भर दिला असता तर असे कच्चे दुवे राहण्याचं प्रमाण निश्चित कमी करता आलं असतं.

चित्रपटातील हिंदी कलाकारांच्या भूमिका हा खचितच या चित्रपटाच्या बाबतीत उत्कंठावर्धक भाग आहे. कलाकारांच्या या भाऊगर्दीत अभिनेत्री विद्या बालनने साकारलेली बडी बेगमची भूमिका अधिक भाव खाऊन जाते. फरदीन खानने शाहजहानची आणि अमोल गुप्ते यांनी आदिलशाहची भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला आहे. संजय दत्त याने त्याच्या नेहमीच्या शैलीत अफझलखान साकारला आहे. संभाजीराजांची भूमिका निभावण्याचा आणि बर्‍यापैकी सावरत मराठीतले एकदोन संवाद म्हणण्याचा उत्तम प्रयत्न अभिषेक बच्चनने केला आहे. तितकाच प्रामाणिक प्रयत्न जिनिलिया देशमुखने सईबाईंच्या भूमिकेसाठीही केला असल्याचं जाणवतं. त्यातल्या त्यात भाग्यश्री पटवर्धन यांची जिजाऊ उजवी वाटते. मराठी कलाकार जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा अधिक हायसं वाटतं यात शंका नाही. महेश मांजरेकर यांनी साकारलेले लखुजी, जितेंद्र जोशी यांनी केलेली पंत गोपीनाथ बोकिलांची भूमिका, अशोक समर्थ यांचे कान्होजी जेधे यांनी खरी रंगत आणली आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांनी फार संयतपणे शहाजीराजे साकारले आहेत, त्यांना अधिक वाव मिळायला हवा होता, असं वाटतं. आणि स्वत: रितेशनेही शिवाजीराजांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातले भावनिक प्रसंग, युध्दाचे काही प्रसंग त्याने उत्तम वठवले आहेत. पण, या व्यक्तिरेखा आणि त्यांची वेशभूषा यातही एकप्रकारचा विसंवाद जाणवतो. सगळ्यांचे पोशाख हे सुंदर आहेत, पण त्यांचा रंग, कपड्याचा पोत, त्यावरचे नक्षीकाम पाहता त्या काळाची अनुभूती कुठेच येत नाही. संतोष सिवन यांच्यासारखा उत्तम छायाचित्रणकार असूनही प्रभाव पडलेला नाही. अजय-अतुल यांचे ‘छत्रपती’ हे गाणे अधिक प्रभावी वाटते. या सगळ्याचा मिळून खरंतर एक रसरशीत अनुभव चित्रपटातून मिळायला हवा, त्याऐवजी एक भव्य ऐतिहासिक कलाकृती म्हणून समाधान मानावे लागते.

दिग्दर्शक – रितेश विलासराव देशमुख

कलाकार – रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, विद्या बालन, भाग्यश्री पटवर्धन, अभिषेक बच्चन, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अशोक समर्थ, जितेंद्र जोशी, बोमन इराणी आणि सलमान खान.