मुंबई म्हटले की बॉलिवूड आलेच! बॉलिवूड ही मुंबईची खासियत! बॉलिवूडमधील तारे-तारकांची घरे पाहाण्यासाठी देश-विदेशातून अनेकजण मुंबईत दाखल होतात. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान आणि राजेश खन्नासारख्या सुपरस्टार कलाकारांच्या घराचा तर मुंबईच्या प्रेक्षणीय स्थळात समावेश होतो. अशाच एका बॉलिवूड सुपरस्टारच्या घराची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा कार्टरोडवरील ‘वरदान आशिर्वाद’ बंगला मुंबईतील एका व्यावसायिकाने ९० ते ९५ कोटी इतक्या किंमतीला विकत घेतल्याचे समजते. ६०३ चौ.मी. क्षेत्रफळ असलेला हा बंगला दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांनी चित्रपट अभिनेते राजेन्द्र कुमार यांच्याकडून त्यावेळी ३.५ लाख इतक्या किंमतीला विकत घेतला होता. राजेश खन्ना यांच्या भरभराटीच्या काळात त्यांची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांची झुंबड या बंगल्याच्या बाहेर पाहायला मिळायची. त्यांची गाडी बंगल्याबाहेर पडली की तरुणी अक्षरश: गाडीसमोर येऊन उभ्या राहायच्या. असे वैभव अनुभवलेल्या या बंगल्याची खरेदी मुंबईस्थित व्यावसायिक शशी किरण शेट्टी यांनी केली आहे. २०१२ साली निधन झालेल्या राजेश खन्ना यांची आपल्या बंगल्याचे संग्रहालय व्हावे अशी इच्छा होती. त्यांच्या मृत्यूनंतर बंगल्याची कायदेशीर मालकी त्यांच्या दोन मुली ट्विंकल आणि रिंकी यांच्याकडे आली. राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांची निकटवर्तिय अनिता अडवानी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात त्यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता, जो नंतर न्यायालयातसुध्दा दाखल झाला होता. आता बॉलिवूडच्या या पहिल्या सुपरस्टारचा चढ-उतार पाहिलेल्या बंगल्याची मालकी दुसऱ्याकडे जाणार असली, तरी त्यांच्या आठवणी अजरामर आहेत. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन चुन्नीलाल खन्ना असे होते. गेल्या शुक्रवारी त्यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय आणि चाहत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.