Rajinikanth Auto Rickshaw Entry Dharman Movie Shooting: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असून, त्यांचा साधेपणा नेहमीच लक्ष वेधून घेतो. सध्या थलायवा हे म्हैसूरमध्ये शूटिंग करीत असून, त्यांनी चाहत्यांची भेट घेतली. रिक्षातून उतरून त्यांनी चाहत्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

सुपरस्टार रजनीकांत हे लवकरच ‘धर्मन’ या अ‍ॅक्शन सिनेमात झळकणार असून, त्याचे दिग्दर्शन अश्वथ मरीमुथू यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाची घोषणा झाली होती. त्यानंतर आता रजनीकांत हे आऊटडोअर शूटिंग करीत असल्याचे दिसून आले. शूटिंगची माहिती मिळताच रजनीकांत यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते सेटजवळ पोहोचले. त्यानंतर रजनीकांत शूटिंगच्या ठिकाणी थेट ऑटोरिक्षातून दाखल झाल्याचे पाहून चाहते थक्क झाले.

रिक्षातून रजनीकांत येताच चाहत्यांचा जल्लोष

थलायवा रजनीकांत रिक्षातून येताच चाहत्यांनी जल्लोष केला. चाहत्यांना भेटण्यासाठी रजनीकांत रिक्षातून उतरून पुढे आले; मात्र यावेळी त्यांना प्रचंड सुरक्षा असल्याचे दिसून आले. चाहत्यांना रजनीकांत यांच्या जवळ जाऊन, त्यांना भेटण्याची संधी मिळाली नसली तरी त्यांची एक झलक पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले. रजनीकांत येताच गेट बंद करणाऱ्या सुरक्षा रक्षकास त्यांनी थांबवून चाहत्यांना एक झलक दाखवली. रजनीकांत यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे ‘धर्मन’ सिनेमाची निर्मिती कमल हासन यांनी केली आहे. जून महिन्यामध्ये कमल हासन यांनी रजनीकांत यांच्याबरोबर सिनेमा करत असल्याचे जाहीर केले होते. ‘धर्मन’ सिनेमामध्ये रजनीकांत यांच्यासह सिमरन, राशी खन्ना व योगी बाबू यांचा समावेश आहे. मात्र, शूटिंग सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने तेलुगू कलाकार राम पोथिनेनी व श्रीलीला हेदेखील या सिनेमाचा भाग असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.