Rajinikanth Mithun Chakraborty Jailer 2 Movie : रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ (Jailer 2) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा असून, त्यामध्ये बॉलीवूडमधील कलाकारसुद्धा झळकणार आहेत. ‘जेलर २’मध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री विद्या बालन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अनेक वर्षांनंतर मिथुन हे दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणार आहेत. रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्यापूर्वी मिथुन यांनी निर्मात्यांसमोर एक अट ठेवल्याचा खुलासा रजनीकांत यांनी केला आहे.

‘जेलर २’ या चित्रपटात काम करण्यास होकार देण्यापूर्वी मिथुन यांनी निर्मात्यांसमोर एक खास अट ठेवली होती. त्याबाबत रजनीकांत यांनी स्वतः खुलासा केला आहे. मिथुन यांची अट अशी होती की, रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना रजनीकांत यांच्या ‘टायगर’ मुथुवेल पांडियन या व्यक्तिरेखेने त्यांना मारहाण करायची नाही किंवा त्यांच्यावर गोळी झाडायची नाही.

जनीकांत यांच्याकडून मार खायचा आहे का? – मिथुन

याबद्दल खुलासा करताना सुपरस्टार रजनीकांत म्हणाले, “ते माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी विचारले की, त्यांना कोणती भूमिका करायची आहे. मिथुन म्हणाले, ‘मी खलनायक आहे का? मला रजनीकांत यांच्याकडून मार खायचा आहे का?’, असे असेल, तर चालते व्हा.”

पुढे रजनीकांत म्हणाले, “त्यानंतर वेव्हज समिटच्या एका कार्यक्रमात माझी आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी आमचं बोलणं या विषयावर आलं, तेव्हा मिथुन मला म्हणाले, ‘तुम्ही सांगितलं तर मी हा सिनेमा करेन.’ मात्र, त्यांची एक अट होती. ते म्हणाले, ‘तुम्ही मला मारहाण करायची नाही किंवा माझ्यावर गोळी झाडायची नाही.’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘मी दिग्दर्शकांना विचारून तुम्हाला सांगतो.’ पण ते हे केवळ बोलण्यापुरतंच म्हणत आहेत, याची मला खात्री होती.”

रजनीकांत जेलर २

मिथुन चक्रवर्ती यांनी २०१५ मध्ये ‘यागावरायिनुम ना कक्का’ या सिनेमातून तमीळ सिनेविश्वात पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतर ते आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याही तमीळ सिनेमात दिसले नव्हते. त्यामुळे ‘जेलर २’मधील त्यांची भूमिका आणि खासकरून रजनीकांत व मिथुन यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यापूर्वी रजनीकांत व मिथुन यांनी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘भ्रष्टाचार’ (१९८९) या सिनेमात एकत्र काम केले होते.