अभिनेता आर माधवनचा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. प्रेक्षक तसंच समिक्षक आणि अनेक सेलिब्रिटींनी देखील सिनेमाचं कौतुक केलंय. यातच सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील सिनेमाचं आणि आर. माधवनचं भरभरुन कौतुक केलंय.

आर माधवन याने ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. पदार्पणातच त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळालीय. सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विटरवर तामिळ भाषेत एक पोस्ट शेअर केलीय. यात ते म्हणाले, “रॉकेट्री हा सिनेमा प्रत्येक व्यक्तीने तसचं खास करुन प्रत्येक तरुणाने एकदा तरी पहावा असा सिनेमा आहे. देशाचा अवकाश संशोधन कार्यक्रम विकसित करण्यासाठी पद्मभूषण नांबी नारायणन यांनी खूप संघर्ष केलाय. नांबी नारायणन यांच्या संघर्षावर सिनेमा बनवून माधवनने उत्तम दिग्दर्शकांच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. या सुंदर सिनेमासाठी तुझे आभार आणि अभिनंदन.” असं रजनीकांत त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले. तसंच त्यांनी आर माधवनचं अभिनंदनही केलं.


‘रॉकेट्री’ हा सिनेमा इस्रोचे संशोधक नांबी नारायणय यांच्या जीवनावर आधारित आहे. नांबी याचं इस्रोमध्ये रॉकेट संशोधनात मोठं योगदान राहिलं आहे. मात्र त्याच्यावर हेरीगिरीचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे त्यांना जवळपास २० वर्ष न्यायालयीन लढा द्यावा लागला. शिवाय काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. या २० वर्षात त्यांना मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं होतं.

नांबी यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यात आले. २०१९ सालामध्ये नांबी नारायणन यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘रॉकेट्री’ या सिनेमात नांबी नारायणन यांच्या संघर्षासोबतच देशाच्या अंतराळ कार्यक्रमातील त्याच्या योगदानाचा मागोवा घेण्यात आलाय. या सिनेमात आर. माधवनने नांबी यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती देखील माधवनने केली आहे.