सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट १० ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने आठ दिवसात तुफान कमाई केली आहे. रजनीकांत यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम चित्रपट हिट झाल्याने आनंद साजरा करत आहेत. अशातच रजनीकांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर हा चित्रपट पाहणार असल्याची माहिती समोर आली आहे. रजनीकांत लखनऊला पोहोचले आहेत.




मुख्यमंत्र्यांबरोबर आगामी भेटीबद्दल विचारले असता रजनीकांत म्हणाले, “होय, मी त्यांच्याबरोबर माझा चित्रपट (जेलर) पाहणार आहे.” यावेळी त्यांनी जेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावर देखील प्रतिक्रिया दिली आणि कारमध्ये बसण्यापूर्वी ‘हा सर्व देवाचा आशीर्वाद आहे’ असं म्हणाले. दरम्यान, रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर सिनेमा पाहतीलच, पण ते लखनऊमधील काही धार्मिक स्थळांनाही भेट देतील, अशी माहिती समोर आली आहे.
लखनऊला येण्यापूर्वी रजनीकांत रांचीला गेले होते. शुक्रवारी त्यांनी राज्यातील छिन्नमस्ता मंदिराला भेट दिली. बिरसा मुंडा विमानतळावर आल्यानंर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “खूप छान वाटलं. मी छिन्नमस्ता मंदिरात गेलो होतो. मी अनेक वर्षांपासून या मंदिरात जाण्याचा विचार करत होतो आणि यावेळी तिथे गेल्यावर मला खूप छान वाटलं. मी तिसऱ्यांदा इथे आलोय आणि दरवर्षी येईन.”
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’मध्ये रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि कॉमेडियन योगी बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यासोबतच मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. चित्रपटात रजनीकांत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ८ दिवसात २३५.६५ कोटींची कमाई केली आहे.