सुपरस्टार रजनीकांत यांच्या लोकप्रियता सर्वश्रृत आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट चाहते आवर्जून पाहतात. कल्पनेच्या पलीकडील अप्रतिम अॅक्शनसीन्स हे  रजनीकांत यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. त्यांच्या चित्रपटात कोणतीही गोष्ट नेहमी भव्यदिव्यच असते. आता त्यांचा आगामी ‘रोबो-२’ हा चित्रपट एक नवा विक्रम नोंदविण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रोबो-२’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाच महागडा चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत. ‘रोबो-२’ चित्रपटाचे प्रस्तावित बजेट हे २०० ते ३०० कोटी इतके आहे.

गेल्याच आठवड्यात रजनीकांत मुलगी ऐश्वर्या धनुषसोबत अमेरिका दौरयावर होते. यावेळी चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन, मेक-अप टेस्ट आणि बॉडी स्कॅन करण्यात आले. ‘रोबो’च्या पहिल्या भागात विक्रमचा लूक डिझाईन करणारी टीम ‘रोबो-२’ साठी रजनीकांत यांच्या लूकवर काम करत आहे.

विशेष म्हणजे, हॉलीवूडचा सुपस्टार अर्नोल्ड श्वार्झनेगरला चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. मात्र, त्याने भूमिकेसाठी २० मिलिअन डॉलरची (सुमारे १२० कोटी) मागणी केल्यामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान हे या चित्रपटाला संगीत देणार असून बाहूबली चित्रपटाच्या व्हीएफएक्सचे काम केलेले श्रीनिवास मोहन स्पेशल इफेक्ट्स देणार आहेत.