दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. आज २५ ऑक्टोबरला हा पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी रजनीकांत हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. रजनीकांत यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांचे चाहते फार आनंदित असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करत आहेत.
सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे.”असं ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले होते.
“माझ्यासाठी हा दिवस फार खास”
दरम्यान काल रविवारी २४ ऑक्टोबरला रजनीकांत या पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीला रवाना झाले. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझ्यासाठी हा दिवस फार खास आहे. मला लोकांचे प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे मला भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जात आहे. विशेष म्हणजे माझ्यासाठी हा दिवस खास असण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, माझी मुलगी सौंदर्या एक सोशल मीडिया अॅप लाँच करणार आहे. हे अॅप लोकांसाठी फार उपयुक्त ठरेल,” असे मला आशा आहे, असे त्यांनी सांगितले.
रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.गेली 30 वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून केली. कन्नड नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळाले यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले.
‘बिल्ला’ सिनेमाने दिली ओळख
रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमवरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते.
रजनीकांत यांनी आजवर वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत. बिनधास्त, धडाकेबाज तसचं कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी अशा सर्व प्रकारच्या अभिनयातून त्यांनी दाक्षिण्यात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही त्यांची ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये ‘अंधा कानून’ सिनेमातून त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चाहत्यांची पसंती मिळवली. तर त्यानंतर हम, रा,वन, अगाज, रोबोट, शिवाजी द बिग बॉ़स अशा अनेक हिंदी सिनेमातून देशवासियांचं प्रेम मिळवलं.