scorecardresearch

राजश्रीचा फेम गेम

‘सेक्रेड गेम्स’ या मोठय़ा वेबमालिकेतून नावारूपाला आल्यानंतर अभिनेत्री राजश्री देशपांडे हे नाव अनेकदा चर्चेत राहिले आहे.

गायत्री हसबनीस

‘सेक्रेड गेम्स’ या मोठय़ा वेबमालिकेतून नावारूपाला आल्यानंतर अभिनेत्री राजश्री देशपांडे हे नाव अनेकदा चर्चेत राहिले आहे. हिंदी चित्रपटात कारकीर्द करतानाही या मराठी अभिनेत्रीने ‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांची निवड केली. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘फेम गेम’ या माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या वेबमालिकेतून राजश्रीने पोलीस निरीक्षकाची भूमिका केली आहे. ओटीटीचा वाढता व्यासंग पाहता विविध प्रकारचे विषय हाताळले जात असतानाच त्यात अनेक कलाकारांना मिळणारा वाव आणि प्रेक्षकमान्यता राजश्रीला खूप सुखावणारी वाटते. एक अभिनेत्री म्हणून तिचा अंदाज अनेकदा बोल्ड वाटत असला तरी ती संवेदनशील कलाकार आहे.  सामजिक कार्यात विशेषत: शाळा आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून ती समाजकार्यातही तितकीच सक्रिय आहे.

‘कथा ही सर्वात जास्त महत्त्वाची असते, कारण सरतेशेवटी कथेतून एका व्यक्तीची गोष्ट आपल्यासमोर येते. त्यामुळे ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष.. त्यावरून मग कथा स्त्रीप्रधान आहे की पुरुषप्रधान, अशा विचारात अडकू नये. त्यापेक्षा त्यातून एका व्यक्तीची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते आहे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे,’’ असे मत अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने व्यक्त केले. अलीकडे गेल्या अनेक वर्षांत स्त्रीप्रधान चित्रपट आणि नायिकांना सिनेसृष्टीत अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. राजश्रीने स्वत:देखील अनेक स्त्री केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटांतून अभिनय केला आहे,  मात्र असा भेद आपल्याला पटत नाही, असे उत्तर तिने दिले.

‘‘आपल्याला स्त्रीप्रधान चित्रपट आणि तसे विषय हवे असतात. चित्रपटसृष्टीतही तसे चित्रपट तयार होतात; परंतु माझ्या मते व्यक्ती आणि तिची गोष्ट जास्त ठळकपणे कथानकांतून प्रेक्षकांसमोर आली पाहिजे. हेही तितकेच खरे की स्त्रियांना चित्रपटातून एक वस्तू म्हणून समोर आणता कामा नये, असे होत असेल तर ते गंभीर आहे. सत्तर ते ऐंशीच्या दशकातही स्त्रीप्रधान कथा आल्या होत्या. नंतर परत तोच मर्द को दर्द नही होतावाला मामला सुरू झाला आणि स्त्रियांचे सादरीकरण फक्त शोभेची वस्तू म्हणून केले जाऊ लागले. या सगळय़ात बदल जरी झाला असला तरी सामाजिक, राजकीय या सर्वच पटलांवर स्त्रियांचे असलेले प्रभुत्व आणि महत्त्व येत्या काळात अधिक अधोरेखित व्हायला हवे हेही तितकेच खरे,’’ असे परखड मत राजश्री व्यक्त करते. 

राजश्रीने साकारलेले ‘फेम गेम’ या वेबमालिकेतील पात्र समलैंगिक आहे. या व्यक्तिरेखेच्या वैयक्तिक आयुष्यातील हाही एक कोपरा समर्थपणे पडद्यावर साकारला जातो याबद्दल राजश्री म्हणते, ‘‘सामान्य आयुष्यातही समलैंगिकांचे जीवन योग्यरीत्या पडद्यावर साकारले जाते आहे आणि त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जाते आहे. तेसुद्धा माणूसच आहेत आणि ते आपल्या अवतीभोवती समाजात कुठे तरी असतातच. त्यांची आवडनिवड, त्यांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या भावनाही समजून घेता आल्या पाहिजेत. यातही जी समानता जपली आहे त्याचे समाधान आहे व अशा व्यक्तिरेखेची खरी ओळख ‘फेम गेम’च्या माध्यमातून जगासमोर आली आणि प्रेक्षकांनीही तिला स्वीकारले याबाबतही आनंद वाटतो. प्रामुख्याने अशा व्यक्तिरेखेचे वास्तव चित्रण ‘फेम गेम’मधून योग्य प्रकारे केले गेले आहे,’’ असे सांगून तिने वेबमालिकेच्या लेखकांचे कौतुकही केले.

राजश्री सध्या ओटीटीवरचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या सामाजिक कार्याबरोबरच तिने आपल्या अभिनयाची कारकीर्दही व्यवस्थित सांभाळली आहे. ओटीटीवरील नवनव्या विषयांसाठी जेव्हा राजश्रीला विचारणा होते तेव्हा तिला समाधान वाटते, असे ती म्हणते. ‘‘मी व्यक्तिचित्रण पाहून कथा निवडते. आपण किती कमी काम केले तरी जे काही काम करू ते संवेदनशील आणि योग्य असावे, अशीच माझी धारणा असते. चित्रपटांच्या बाबतीतही जसे सादरीकरण, लेखन, दिग्दर्शन आणि कथेचे सार व संहिता महत्त्वाची असते त्याचप्रमाणे ओटीटीलाही याच मात्रा लागू होतात आणि मी त्याच पद्धतीने संहिता निवडते. ओटीटीचे जाळे खूप विस्तारलेले आहे त्यामुळे कलात्मक खुबीला, तशा आविष्काराला येथे खूप वाव आहे. आजच्या काळात तर टीम आणि त्याच्यासमवेत केलेले काम खूप महत्त्वाचे आहे, कारण एक चित्रपट किंवा वेबमालिका तयार करण्यासाठी अनेक हात मागे लागलेले असतात. आज तंत्र बदलले आहे. त्याचबरोबर व्यापही वाढला आहे. तेव्हा योग्य टीमवर्कही खूप महत्त्वपूर्ण ठरते. फक्त काम करून बाहेर पडणं इतकंच नसून सर्व जण ज्या मेहनतीने काम करतात तशीच मेहनत कलाकारांनी घेणे आवश्यक आहे,’’ असे ती म्हणते. ‘‘ओटीटीने कलाकारांना संधी मिळवून दिली आहे. ओटीटीवर चांगल्या गोष्टी होत आहेत, पण तरीही काही गोष्टींमध्ये आपण मागे पडतो आहोत. मला असाही विश्वास वाटतो की, लोक या गोष्टी धुंडाळतील आणि त्यानुसार चांगल्या गोष्टींचा मार्ग ओटीटीसाठीही निवडतील. अद्याप या प्रक्रियेत आपण खूप संथगतीने जात असलो तरी मला आशा आहे की, येत्या काही दिवसांत त्याचा वेगही वाढेल,’’ अशी माहिती तिने दिली.

मराठी चित्रपटात काम करायला आवडेल

‘सत्यशोधक’ या मराठी चित्रपटात राजश्री देशपांडे दिसणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातून मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची प्रामाणिक इच्छाही राजश्रीने या वेळी व्यक्त केली. मी अद्याप एकही मराठी चित्रपट केला नाही; पण मी मराठी चित्रपट पाहते आणि मला अभिमानही खूप वाटतो. तेव्हा नानाविध कथांचा भाग व्हायला मलाही आवडेल, अशी भावनाही तिने व्यक्त केली.

चित्रपटांचा अमुक एक ट्रेण्ड आला, की त्यामागे धावणारी मी नाही. कधी व्यावसायिक चित्रपटांची लाट येते तर कधी चरित्रपटांची; पण मला यातून मार्गक्रमण करायला आवडत नाही. ट्रेण्ड आपण आपले बनवत असतो, पण येथे चित्रपटसृष्टीत हे ट्रेण्ड कोण बनवतं हे माहिती नाही ही एक गंमतच आहे. त्याहीपेक्षा मला योग्य कथेला अनुसरून चित्रपटाबरोबर आणि व्यक्तिरेखेबरोबर पुढे जायला आवडतं. सध्या भावपटांचा जॉनर उदयाला येतो आहे, पण त्यातूनही योग्य जाणिवा कलाकृतीतून उमटाव्यात.’’

–  राजश्री देशपांडे, अभिनेत्री

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajshree fame game sacred games big web series name hindi interested marathi cinema ysh

ताज्या बातम्या