Rajshree More त्रिभाषा सूत्रावरुन राज्यात बराच गोंधळ झालेला पाहण्यास मिळाला. राज ठाकरेंच्या मनसेने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पक्षाचे झेंडे वेगळून भाषेबाबत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अधिवेशनाच्या एग दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही अध्यादेश रद्द केले. दरम्यान या सगळ्या मुद्द्यावरुन एका अभिनेत्रीने एक वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन तिला खडे बोल ऐकण्यास मिळाले ज्यानंतर या अभिनेत्रीने तिचे शब्द मागे घेत वादावर पडदा टाकला आहे. तसंच मुंबई पोलिसांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं आहे असंही या अभिनेत्रीने म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
वर्सोव्यात राहणारी अभिनेत्री राजश्री मोरेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तिने मराठी माणसामध्ये मेहनत करण्याची क्षमता नसते, आधी मराठी माणसाला मेहनत करायला शिकवा, परप्रांतीय लोक मुंबईतून निघून गेले तर मराठी माणसाची अवस्था बिकट होईल असं म्हणत अपमानास्पद शब्द वापरले होते. या व्हिडीओला तीव्र विरोध झाला, तसंच या अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरुन थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात राजश्री मोरेच्या विरोधात त्रकार दाखल केली. ज्यानंतर राजश्री मोरेला माफी मागावी लागली तसंच तिला तो व्हिडीओ डिलिट करण्याचे निर्देशही देण्यात आले. आता नव्या व्हिडीओत राजश्री माफी मागताना दिसते आहे.
काय म्हटलं आहे राजश्री मोरेने?
नमस्कार मी राजश्री मोरे, मी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मी त्यावेळी मराठी माणसांबाबत चुकीचे शब्द वापरले. मी ते शब्द मागे घेते. मला माहीत नव्हतं की एक राजकीय पक्ष माझ्या व्हिडीओचा राजकीय मुद्दा बनवेल आणि मला ओशिवरा पोलीस ठाण्यात टार्गेट करतील. मी माझे शब्द मागे घेते. असं राजश्री मोरेने म्हटलं आहे. मी ओशिवरा पोलीस ठाण्यातल्या पोलिसांचे आणि मुंबई पोलिसांचे मी आभार मानते. मला टार्गेट करण्यात आलं. मात्र पोलिसांनी हे सगळं प्रकरण व्यवस्थित हाताळलं. माझ्या मराठी बांधवांनी कुठलाही गैरसमज माझ्याबाबत मनात ठेवू नये.
मुंबईत जेवढे विविध जातींचे लोक आहेत त्यांना तुम्ही सतावू नका असंही आवाहन राजश्री मोरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. सरकारने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात आलं.