कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. या व्हिडिओत राजूने बिग बॉस फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेचा अपमान केल्याचा दावा केला जातोय. राजू एका कॉमेडी शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता. तेथे त्याला बिग बॉसच्या घरात सध्या राहत असलेल्या स्पर्धकांवर विनोद करण्यास सांगितले होते. तेव्हा राजूने त्याची विनोदबुद्धी वापरून प्रत्येक स्पर्धकावर आपले कॉमेडीचे तीर सोडले. पण, शिल्पावर विनोद करत असताना त्याने मर्यादा ओलांडल्याचा आरोप सध्या त्याच्यावर केला जातोय.

वाचा : कुलभूषण जाधव यांच्याबद्दल मौन बाळगणाऱ्या बॉलिवूडकरांवर मधुर भांडारकरची टीका

बिग बॉसमध्ये शिल्पाला सर्वजण आई (माँ) मानत असल्यामुळे तिला ‘शिल्मा’ नावाने संबोधले जाते. यावरून राजूने विनोद करत म्हटले की, ‘अगर माँ बनने का इतना शौक है तो घर से बाहर आओ, शक्ति कपूर तुम्हारा इंतजार कर रहा है’. पण हा व्हिडिओ व्हायरल होताच राजूवर टीकेची झोड उटण्यास सुरुवात झाली. त्यावर त्याने फेसबुकच्या माध्यमातून आपली बाजू मांडली.

वाचा : युवराजने विराट-अनुष्काला दिली ‘क्यूट’ नावे

राजूने लिहिलं की, ‘मी महिलांचा सन्मान करतो आणि कधीच त्यांच्या सन्मानाविरोधात अपशब्द वापरत नाही. माझ्या मनात शिल्पासाठी आदर असून मी तिच्यासोबत कामसुद्धा केले आहे. सध्या जो काही डायलॉग व्हायरल होतोय तो अर्धवट आहे’. वाहिनीने राजूचा डायलॉग अर्धवट प्रसारित केल्याचा दावा त्याने केला आहे. ‘तुम्हे माँ बनने का इतना शौक है तो बाहर निकल, शक्ति कपूर तेरा इंतजार कर रहा है फिल्मों में अपनी माँ बनाने के लिए. नवाजुद्दीन सिद्दीकी भी अपनी फिल्मों में तुम्हें माँ बनाने को तैयार है’, असा मूळ डायलॉग असल्याचे राजूने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले.

माझ्या व्हिडिओसह कलर्स वाहिनीने छेडछाड केली असल्यास मी त्यांच्यावर नाराज आहे. त्यांच्या चुकीकरता मला दोषी ठरवू नका. पण, तरीही माझ्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे राजूने शेवटी म्हटले.