बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. आता पुन्हा राखीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यात राखी ही रुग्णालयात दिसत असून तिच्यावर उपचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेअर करण्यात आला आहे. यात तिने मला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगत आहे. “मित्रांनो, मी रुग्णालयात आहे. नर्स माझी तपासणी करत आहे. मी आजारी आहे. नुकतंच एक पद्मश्री पुरस्कार मिळालेली अभिनेत्री जे काही बरळली, त्याने मला जबर धक्का बसला”, असं राखीनं म्हटलं आहे.

”मी माझ्या देशावर खूप प्रेम करते. तुम्हालाही तुमच्या देशावर प्रेम आहे, हे मला माहिती आहे. तुला पद्मश्री पुरस्कार हा भीक म्हणून दिला आहे. जर भीक मागून पुरस्कार मिळाला असेल तर मग आपल्या देशाच्या जवानांनी कारगीलचे युद्ध जिंकले, त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? असा प्रश्न राखीने विचारला आहे. ती आपल्या मातीचा आदर करत नाही. त्यामुळेच तिला नरकात स्थान मिळणार नाही,” असे राखी म्हणाली.

नेमकं प्रकरण काय?

८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

“देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली.

“मी माझ्या सोशल मीडियावर एक कलाकार म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून सक्रीय असते. मी तिथे कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. मी तिथे नेहमीच देशाचे मुद्दे मांडत असते,” असेही कंगनाने सांगितले. दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या वक्तव्यावरुन तिला ट्रोलही केले जात आहे.