‘आयटम गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. काही दिवसापूर्वीच तिने नाना -तनुश्री वादामध्ये नानांची बाजू घेतली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशाझोतात आल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणानंतर राखीला धमकीचे फोन आल्यामुळे तिने पोलीस तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, राखीने ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसापूर्वी नाना-तनुश्री वादाविषयी राखीने जाहीरपणे तिचं मत मांडलं होतं. १० वर्षापूर्वी सेटवर काय झालं होतं याचा खुलासा राखीने यावेळी केला होता. तेव्हापासून राखीला एका अज्ञात व्यक्ती फोन करुन त्रास देत आहे, असं राखीने म्हटलं आहे.
‘गेल्या काही दिवसापासून एक अज्ञात व्यक्ती मला सतत फोन करुन असभ्य भाषेत बोलत आहे. इतकंच नाही तर नाना-तनुश्री वादात मी काही बोलले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी या अज्ञात इसमाने मला दिली आहे. त्यामुळेच मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत असून ते लवकरच या अज्ञातांचा शोध घेतील, असं राखी म्हणाली.
दरम्यान, तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरोधात गैरवर्तन केल्याचं आरोप केला आहे. तनुश्रीच्या या आरोपानंतर अनेकांनी नाना पाटेकरांना पाठिंबा दिला असून राखीनेही नानांचीच बाजू घेतली आहे.