राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. देशभरात करोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या सगळ्या गोष्टी असून ही देशभरात सुरू असलेल्या आयपीलच्या क्रिकेट मॅचवर बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतने नाराजी व्यक्त केली आहे.

‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने IPLवर संताप व्यक्त केला आहे. “तू आयपीएलला फॉलो करतेस का?”, असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. हे ऐकताच राखी संतापली आणि म्हणाली, “करोनाचे नियम सर्वसामान्य लोकांसाठी वेगळे आणि क्रिकेटपटूंसाठी वेगळे आहेत का? मुंबईत दररोज करोनामुळे लोक मरतायेत आमचं आयुष्य इकडचं तिकडे झालं आहे, आणि हे इथे आयपीएल खेळतं आहे,” राखीच्या या वक्तव्यावर अनेकांनी हे बरोबर असल्याचे म्हटले आहे. तर, या आधी काही सेलिब्रिटींनी देखील आयपीएलवर प्रश्न उपस्थित केले होते.

पुढे ती म्हणाली, ” मुंबईत लोक कुठे वाचले आहेत. मुंबई बंद असल्याने अनेक लोक मुंबईच्या बाहेर राहायला गेले आहेत, तर करोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक मालदिवला गेले आहेत. मी एकटीच इथे आहे. सगळे मला सोडून मालदिवला सुट्टीचा आनंद घेत आहेत.”

राखी सावंत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी बॉलिवूड तर कधी देशभरातील घडामोडिंवर ती तिचे मत मांडत असते. या आधी ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वामुळे राखी चर्चेत आली होती.