Ram charan jasprit bumrah apology : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा सोशल मीडियावर जोरदार चर्चेमध्ये आला आहे. मात्र, यावेळी तो कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर एका वक्तव्यात झालेल्या चुकीमुळे ट्रोल होत आहे. एका म्युझिक इव्हेंटदरम्यान झालेल्या रॅपिड फायर राउंडमध्ये राम चरणकडून अनवधानाने मोठी चूक झाली. भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहला त्याने फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी धन्यवाद मानले. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अखेर ही चूक लक्षात आल्यानंतर राम चरणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.

अभिनेता राम चरण याचा ‘पेड्डी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. भोपाळमध्ये पेड्डी (Peddi) चित्रपटाचा भव्य संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ए. आर. रेहमानसह चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते. म्युझिक लॉन्च कार्यक्रमामध्ये अभिनेता राम चरणने उपस्थितांशी संवाद साधला.

तसेच यावेळी त्याला भारतीय खेळाडूंबाबत प्रश्न विचारण्यात आले. रॅपिड फायर पद्धतीने या प्रश्नोत्तरामध्ये राम चरणने इतर खेळांडूबाबत चपखल उत्तरे दिली. मात्र, बॉलर जसप्रीत बुमराहबद्दल प्रश्न विचारल्यानंतर राम चरण गडबला आणि त्याने जसप्रीतला फुटबॉलर म्हणून संबोधले.

भारतीय खेळाडूंचे केले कौतुक

राम चरणला भारतीय खेळांडूबाबत प्रश्न विचारण्यात आला. सचिन तेंडुलकरबद्दल विचारल्यावर ‘लॉन्ग लेजेंडर’ म्हटले. तसेच एम. एस. धोनीचे वर्णन ‘शांत आणि संयमी’ आणि विराट कोहलीला ‘फायर’ म्हटले. याचबरोबर रोहित शर्माचा उल्लेख ‘सर्वांचा लाडका’ असा केला. मात्र, यानंतर राम चरणला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारला असता त्याने अनावधानाने त्याला फुटबॉलर म्हटले.

बुमराहबद्दल काय म्हणाला राम चरण?

राम चरण म्हणाला की, “जसप्रीत बुमराहजी, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मला फुटबॉल खूप आवडतो आणि तुम्ही फुटबॉलला ज्या पद्धतीने पुढाकार देत आहात, ते मला आवडते,” असे राम चरण म्हणाला. यामुळे उपस्थितांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राम चरणला ट्रोल करण्यात आले. यानंतर रामने ट्विट करून माफी मागितली आहे.

राम चरणने मागितली माफी

अभिनेता राम चरणच्या चूक लक्षात आल्यानंतर त्याने ट्विट केले. त्याने लिहिले की, मी नावांच्या बाबतीत खूपच विसरभोळा आहे. नावे माझ्या लक्षात राहत नाही. जो गोंधळ झाला त्याबद्दल मी जसप्रीत बुमराहजी यांची माफी मागतो. उत्साहाच्या भरात अनावधानाने ही चूक झाली, मी तुमचा मनापासून आदर करतो आणि तुमच्या खेळाचा मोठा चाहता आहे. जेव्हा तुमच्या बॉलिंगमुळे फलंदाजांना खेळता येत नाही, तेव्हा भारतीयांना तुमचा खूप अभिमान वाटतो, असे अभिनेता राम चरणने म्हटले आहे. तसेच कार्यक्रमामध्ये भोपाळच्या जनतेला त्याने चुकून बिहारची जनता म्हणून संबोधले होते.