Ram Charan At Vijay-Rashmika’s Reception : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा हे दोघे सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. २६ फेब्रुवारीला लग्नसोहळा पार पडल्यानंतर दोघेही त्यानंतरच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र होते. रश्मिकानं यावेळी विजयच्या मूळ गावी जाऊन लग्नानंतर पूजादेखील केली. त्यानंतर या जोडीनं त्यांच्या चाहत्यांसहित तेथील पत्रकारांच्याही भेटी घेतल्या. आता या जोडीचा स्वागत समारंभ पार पडला आहे.

रश्मिका व विजय यांच्या लग्नानंतर हैदराबाद येथे त्यांचा स्वागत समारंभ होता. काल बुधवारी (४ मार्च) त्यांचा हा समारंभ झाला, ज्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावत या नवदामपत्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बॉलीवूडसह तेलुगू, तमीळ, कन्नड इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांच्या उपस्थितीत त्यांचा हा सोहळा पार पडला. अल्लू अर्जुन, नागार्जुन, करण जोहर, क्रिती सेनॉन, नम्रता शिरोडकर, रिया चक्रवर्ती, श्रीलीला, मृणाल ठाकूर यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी रश्मिका व विजय यांनी या प्रसंगी हजेरी लावली होती. यावेळी एका दाक्षिणात्य अभिनेत्यानं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि तो अभिनेता म्हणजे राम चरण.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता राम चरण रश्मिका-विजयच्या स्वागत समारंभाला सहपत्नीक पारंपरिक लूकमध्ये पोहोचला होता. परंतु, यावेळी तो अनवाणी होता. राम चरण रश्मिका व विजय यांच्या स्वागत समारंभाला अनवाणी पोहोचल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल होत असून, अनेक नेटकरी त्याबद्दल कमेंट्स करीत आहेत. पण, राम चरण रश्मिका व विजय यांच्या स्वागत सोहळ्याला अनवाणी का पोहोचला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

…म्हणून अनवाणी पोहोचला राम चरण?

माध्यमांच्या वृत्तानुसार अभिनेता राम चरण सध्या अय्यप्पा दीक्षा व्रत करत आहे. या व्रतादरम्यान काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे असतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे ४० ते ४१ दिवस अनवाणी राहायचं असतं. त्यामुळे काही दिवसांपासून राम चरण जिकडे कुठे जातो तेव्हा तो पायात चप्पल किंवा बूट, असं काहीच परिधान करत नाही आणि सगळीकडे अनवाणी जातो. म्हणूनच विजय व रश्मिका यांच्या त्या सोहळ्यासाठीही तो अनवाणीच गेला होता.

इंस्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या राम चरण व त्याची पत्नी उपासना यांच्या विजय-रश्मिकाच्या स्वागत समारंभामधील व्हिडीओखाली काही नेटकऱ्यांनी याबद्दल कमेंट्स केल्या आहेत. त्यावर एका नेटकऱ्यानं, “राम चरण अय्यप्पा यांचे दीक्षा व्रत करत असल्याने ४१ दिवस तो सलग याचे नियम पाळत आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानंही, “रामचरण ४० दिवस अय्यप्पा यांचे व्रत करत असल्याने तो सर्व नियम पाळत आहे”, असं त्याचं म्हणणं मांडलं आहे. यापूर्वीसुद्धा राम चरणनं हे व्रत केला आहे. ‘आर.आर.आर’साठी ऑस्करकडून पुरस्कार मिळाल्यानंतरही तो या व्रतामुळे चर्चेत आलेला. तेव्हासुद्धा अभिनेता अनवाणीच या पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेला.