अभिनेता राम चरणच्या ‘पेड्डी’ (Peddi) या चित्रपटातील जान्हवी कपूरच्या पात्राचे कपडे व चित्रणावरून सध्या जोरदार टीका होत आहे. पण दुसरीकडे, राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला एक अत्यंत प्रभावशाली महिला आहेत. त्या भारतातील एका सर्वात मोठ्या आणि नामांकित हेल्थकेअर ब्रँडच्या वारसदार आहेत. तब्बल ७७,००० कोटी रुपयांच्या साम्राज्याची त्या वारसदार आहेत. हैदराबादमधील प्रतिष्ठित कामिनेनी कुटुंबात जन्मलेल्या उपासनाने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी काम सुरू केलं. त्यांची आई शोभना कामिनेनी यांनी कुटुंबाचा हेल्थकेअर व्यवसाय वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
७७,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या वारसदार
उपासना कामिनेनी जगभरात २७,००० हून अधिक कर्मचारी असलेल्या ‘झायडस ग्रुप’ या ग्लोबल लाइफ सायन्सेस कंपनीत स्वतंत्र संचालक आहेत. त्या ऑनलाईन फार्मसी सेवा आणि अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा देणाऱ्या ‘अपोलो २४/७’ या हेल्थकेअर प्लॅटफॉर्मच्या बोर्ड मेंबर आहेत. उपासना त्यांचे आजोबा प्रताप सी. रेड्डी यांनी स्थापन केलेल्या ‘अपोलो हॉस्पिटल्स’ या दिग्गज कंपनीच्या ‘सीएसआर’ (Corporate Social Responsibility) उपक्रमांचे नेतृत्व करतात. तसेच त्या ‘फॅमिली हेल्थ प्लॅन इन्शुरन्स टीपीए’च्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.
उपासना कामिनेनी मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
गेल्या काही वर्षांत उपासना कामिनेनी यांच्या सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील कामांची विशेष दखल घेतली गेली आहे. त्यांना ‘दादासाहेब फाळके फिलान्थ्रोपिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तसेच ‘फोर्ब्स’च्या ‘टायकून्स ऑफ टुमारो’ या प्रतिष्ठित यादीतही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
इन्फ्लुएन्सर मासूम मिनावालाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, उपासना यांनी त्यांच्या कुटुंबाने संपत्तीशी संबंधित वाद टाळण्यासाठी कशा प्रकारे आधीच एक कौटुंबिक संविधान तयार केले आहे, याचा खुलासा केला होता.
“आम्ही एक बिझनेस फॅमिली आहोत. आमच्या घरात एक लिखित कौटुंबिक संविधान आहे. संपत्तीवरून घरात कधीही भांडणं होऊ नयेत म्हणून आम्ही नेहमी त्या संविधानाचे नियम पाळतो. आमच्या कुटुंबात संपत्ती हे कधीच वादाचं कारण बनू नये, हाच यामागचा उद्देश आहे. हे सर्व नियम माझ्या आजोबांनी तयार केले आहेत,” असं उपासना म्हणाल्या.
उपासना यांनी कुटुंबातील स्त्री-पुरुष समानतेबद्दल आणि कुटुंबाच्या वारशात महिलांनी आपला समान वाटा कसा मिळवला, याबद्दलही सांगितलं. “मी माझ्या घरात पुरुषप्रधान संस्कृती पाहिली होती, पण सुदैवाने ती बदलली. आमच्या घरातील मुली खूप खंबीर होत्या आणि त्यांनी स्वतःचा हक्क मागून घेतला. आमच्या कुटुंबात स्त्री आणि पुरुषांना अगदी समान वागणूक दिली जाते आणि मला याचा खूप अभिमान आहे,” असं त्या म्हणाल्या.
राम चरण व उपासना कामिनेनी यांची लव्ह स्टोरी
राम चरण आणि उपासना यांची पहिली भेट लंडनमधील एका कॉलेजमध्ये झाली होती. दोघेही तिथे शिकत असताना त्यांची ओळख झाली आणि पाहता पाहता ते एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. सुरुवातीला त्यांच्यात प्रेमासारखं काहीच नव्हतं. ते एकमेकांसोबत खूप भांडायचे, पण तितकीच त्यांची घट्ट मैत्रीही होती. त्यांच्या मित्रांना नेहमी वाटायचं की यांच्यात काहीतरी सुरू आहे, पण राम चरण आणि उपासना मात्र “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत” असंच सांगायचे.
