Ram Charan : राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी ‘पेड्डी’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. तो कलाकार नसून राम चरणचा बॉडीगार्ड केविन कुंटा (Kevin Kunta) आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने दाखवलेल्या धाडसाचं आणि चपळ प्रतिक्रियेमुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
ही घटना ‘पेड्डी’च्या प्रमोशननिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान घडली. या कार्यक्रमात राम चरण, जान्हवी कपूर आणि दिग्दर्शक चाहत्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी एक चाहता अचानक धावत सुटला त्यामुळे तिथे तनावाचं वातावरन निर्माण झालं. तो चाहता कलाकार जिथे बसले होते त्या स्टेजपर्यंत पोहोचला आणि राम चरणला भेटण्याचा प्रयत्न करत होता.
या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओंमध्ये एक चाहता राम चरणकडे धावत जात असल्याचं दिसतं. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामध्ये राम चरणचा बॉडीगार्ड केविन कुंटा याने अतिशय तत्परतेनं प्रतिक्रिया देत त्या व्यक्तीला अडवलं आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी राम चरणला तेथून दूर नेलं. केविनच्या शांत, संयमी आणि कामाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या प्रसंगाचे अनेक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्या सतर्कतेचं आणि जबाबदारीने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
या घटनेनंतर केविन कुंटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. राम चरणबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेहमी दिसणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबाबत अनेकांनी माहिती शोधण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर केविनच्या कामाबद्दल चर्चा रंगू लागली असून, राम चरणच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या बॉडीगार्डविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.
कोण आहे केविन कुंटा
केविन कुंटा, ज्यांचं खरं नाव अब्दू कादिर सोवे आहे, तो २७ वर्षीय व्यावसायिक एमएमए (मिक्स्ड मार्शल आर्ट्स) फायटर आहेत. तो मूळचा पश्चिम आफ्रिकेतील गॅम्बिया देशाचा रहिवासी आहे. फायटर डेटाबेसनुसार, त्याचा जन्म १९९८ मध्ये झाला होता. मामा लामिन ऑफ बार्रा या टोपणनावाने ओळखला जाणारेा केविन कुंटाचा उल्लेख गॅम्बिया रेसलिंग असोसिएशननेही केला आहे. राम चरणचा विश्वासू बॉडीगार्ड म्हणून लोकप्रियता मिळण्यापूर्वीच त्याने मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सार्वजनिक कार्यक्रम आणि चित्रपटांच्या प्रमोशनल इव्हेंट्समध्ये राम चरणबरोबर दिसणारे केविन हे प्रत्यक्षात एक अनुभवी आणि व्यावसायिक एमएमए फायटर आहेत.
केविनच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख आंतरराष्ट्रीय एमएमए खेळाडू असा केला आहे. सोशल मीडियावरही त्याची चांगली लोकप्रियता असून त्याचे ८१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कार्यक्रमांमध्ये तो अनेकदा आकर्षक गडद रंगाच्या सूटमध्ये दिसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राम चरणच्या चाहत्यांमध्ये केविन हा एक परिचित चेहरा बनला आहे.
विशेष म्हणजे, केविनच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल राम चरणनेही यापूर्वी विनोदी अंदाजात भाष्य केलं होतं. एका प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये अमित भाटिया यांच्याशी बोलताना राम चरण म्हणालेला, “सगळ्यांनी त्याला इतकं प्रसिद्ध केलं आहे की आता मी त्याला बाहेर जाऊ देत नाही. कुणी त्याला चॉकलेट किंवा बिस्किट देऊन माझ्याबद्दल माहिती काढतील.” राम चरणच्या या मिश्कील वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. या वक्तव्यातून केविन आणि राम चरण यांच्यातील चांगले संबंध तसंच केविनची चाहत्यांमधील वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली होती.
राम चरणचा बॉडीगार्ड म्हणून ओळख मिळालेली असली, तरी केविनने यापूर्वीच एमएमए क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याची ओळख केवळ सुरक्षा रक्षक म्हणून नसून एक व्यावसायिक लढवय्या खेळाडू म्हणूनही आहे.
