Ram Gopal Varma on Telugu Industry: आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील आर्थिक गणितांवर मोठे विधान केले आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीत वारंवार येणाऱ्या आर्थिक संकटासाठी त्यांनी थेट दिग्दर्शकांमधील जबाबदारीचा अभाव आणि निर्मात्यांचे बजेटवर नसलेले नियंत्रण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ‘ग्रेट आंध्रा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, चित्रपटाचा खर्च वाढल्यास त्याची पूर्ण जबाबदारी दिग्दर्शकाने घ्यायला हवी. याचसोबत एका ज्येष्ठ अभिनेत्रीला काम न करता ५-६ दिवस बसवून ठेवून १ कोटी रुपयांचे मानधन दिल्याचा खुलासाही त्यांनी केला.

राम गोपाल वर्मा म्हणाले, “निर्मात्याला ‘बजेट’चा खरा अर्थ काय, हेसुद्धा समजत नाही. का? कारण दिग्दर्शक किती शॉट्स प्लॅन करतोय, त्याची पूर्वतयारी किती झाली आहे हे त्यांना माहीतच नसतं. बजेट या सगळ्या गोष्टींवरून ठरतं आणि मग निर्माते त्याला मंजुरी देतात. पण या गोष्टी ठरवल्याप्रमाणे घडत नाहीत, आणि सगळं प्लॅनिंग फिस्कटतं, परिणामी बजेट वाढतं. पण एकदा शूटिंग सुरू झाल्यावर थांबायचं कुठे हेच कोणाला समजत नाही.”

दिग्दर्शकाने जबाबदारी घ्यायला हवी – राम गोपाल वर्मा

चित्रपटाचा खर्च वाढल्यास त्याची जबाबदारी दिग्दर्शकाने घ्यायला हवी, पण तेलुगू इंडस्ट्रीत अशी पद्धतच नसल्याचं स्पष्ट मत वर्मा यांनी मांडलं. “दिग्दर्शकाला जबाबदार धरणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कल्पना दिग्दर्शकाची असते आणि पैसा किती खर्च करायचा हेही तोच ठरवतो. जर दिग्दर्शकच उत्तरदायी नसेल, तर हे बिझनेस मॉडेल कसं चालणार?” असं राम गोपाल वर्मा म्हणाले. “असं का घडतं? कारण त्यांच्यात जबाबदारीची जाणीव नसते. स्वतंत्र निर्माते हे नेहमी फक्त पैशांची गुंतवणूक कशी सांभाळायची याचाच विचार करत असतात. जर हिरो विशिष्ट तारखांना उपलब्ध असेल, तर ते फक्त ‘हो’ म्हणतात आणि वाट पाहतात. ‘तुम्ही ठरवाल ते ठीक आहे’ असं म्हणणाऱ्या दिग्दर्शकांना नियंत्रणात ठेवणं कठीण असतं,” असं राम गोपाल वर्मा यांना वाटतं.

आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी कोणत्याही चित्रपटाचे नाव न घेता एक उदाहरण दिलं. “एक चित्रपट खूप मोठा हिट झाला. दिग्दर्शकाला त्याने जेवढे दिवस काम केलं त्यानुसार पैसे मिळाले. त्याला त्याचं मानधन मिळाले. चित्रपट हिट झाला तरी निर्मात्याने फारसा पैसा कमावला नाही. का? कारण सर्व पैसा निर्मितीच्या खर्चात निघून गेला. बजेट वाढल्यामुळे असं झालं,” असं ते म्हणाले.

काम न करता अभिनेत्रीला दिले १ कोटी रुपये – राम गोपाल वर्मा

चित्रपटसृष्टीत पैसे किती निष्काळजीपणे खर्च केले जातात, यासाठी राम गोपाल वर्मा यांनी एका ज्येष्ठ अभिनेत्रीचा किस्सा सांगितला. तिच्याकडून एका चित्रपटासाठी १० दिवसांच्या तारखा घेतल्या होत्या. ती रोज सकाळी सेटवर यायची, मेकअप करायची आणि बोलावण्याची वाट पाहत बसून राहायची. त्या १० दिवसांपैकी ५ ते ६ दिवस तिला एकही सीन शूट करण्यासाठी बोलावलंच गेलं नाही.

“तिला बोलावून ५-६ दिवस झाले होते, पण तरीही ती म्हणत होती की ती हे करणार नाही आणि ॲडव्हान्स परत करेल. तरीही तिला पूर्ण मानधन दिलं, पण काम न करता पैसे घेतल्याबद्दल तिला चांगलं वाटत नव्हतं. दुसरीकडे निर्मात्यांना काहीच फरक पडत नव्हता, ते तरीही पैसे देतच राहिले.” त्या १० दिवसांसाठी त्या अभिनेत्रीने १ कोटी रुपये कमावले असावेत, असा अंदाज वर्मा यांनी व्यक्त केला. जेव्हा सिनेमांचं बजेट १०० कोटींवरून २०० कोटींवर पोहोचतं तेव्हा १-२ कोटी रुपयांचा विचार कोणीच करत नाही, असं त्यांनी नमूद केलं.