राम गोपाल वर्मा
आपल्या सार्वजनिक आयुष्यात रूपके ही केवळ भाषेचे भूषण म्हणून येत नसतात, तर ती वेळप्रसंगी समाजाच्या मनःस्थितीचे टोकदार रूप धारण करून टोचत राहतात. त्यामुळेच सध्या झुरळ या साध्यासुध्या कीटकाचे एका राजकीय प्रतीकात झालेले रूपांतर लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. एका न्यायालयीन टिप्पणीमध्ये बेरोजगार आणि निराश तरुणांची तुलना ‘झुरळां’शी करण्यात आली आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर त्या ‘तुच्छते’ला एकाएकी सन्माननीय केंद्रस्थान प्राप्त झाले.
जेव्हा सत्तास्थानी असलेली अधिकारी व्यक्ती अशाप्रकारे एका तेजस्वी राष्ट्राच्या अंधाऱ्या कोपऱ्यांत ढकलल्या गेलेल्या तरुणांची तुलना ‘झुरळां’शी करत त्यांना तुच्छ, चिवट, निरुपयोगी आणि घाणेरडे ठरवते, तेव्हा हा अपमानित वर्ग त्या अपमानालाच बहुमानासारखा स्वीकारतो आणि त्याचे सत्तेला दिलेल्या प्रत्युत्तरात रूपांतर करतो.
या तरुणांनी त्यांच्याबद्दल वापरलेले तुच्छतादर्शक शब्दच तलवारीसारखे वापरत समाजाचा, सत्तेचा, यशाचा दिखाऊ मुखवटा फाडला. आणि सामाजिक अपयशाचे ओझे तरुणांच्या खांद्यावर टाकू पाहणाऱ्यांचे खरे रूप उघडे केले.
तात्त्विकदृष्ट्या पाहिले तर हा क्षण समाजाच्या तळागाळांतील लोकांनी सौंदर्याच्या प्रस्थापित उतरंडीला दिलेले आव्हान आहे. आधुनिक समाजात फुलपाखरू हे आकांक्षेचे प्रतीक मानले जाते. त्यात सौंदर्य आहे, नाजूकपणा आहे आणि उन्नतीची कल्पना आहे. ‘विकसित भारता’कडे झेपावणाऱ्या स्वप्नांमध्येही फुलपाखराची ही प्रतिमा सहज मिसळून जाते. आणि याउलट, झुरळ म्हणजे जणू नीत्शेचा ‘उबरमेंश’ (अतिमानव). त्याला सौंदर्याची गरज नसते. ते टिकून राहते. प्रलयातून, उपेक्षेतून आणि अंधारातूनही जगतच राहते.
जिथे आर्थिकमंदीच्या पहिल्याच झुळकीत फुलपाखरू गतप्राण होते तिथे, कदाचित म्हणूनच काही तरुणांना झुरळात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. कारण त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू हा तग धरून राहणे आहे. ‘नीट’ पेपरफुटी, वाढती बेरोजगारी, पदव्यांचे अवमूल्यन किंवा सामाजिक प्रतिष्ठेची हळूहळू होणारी झीज असो, त्यांच्यासमोरचा प्रश्न भरारीचा नाही तर अस्तित्व टिकवण्याचा आहे.
भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतही उपेक्षितांविषयी एक संदिग्ध संवेदना दिसते. आंबेडकरी विचारधारेतील दलित आत्मभान, भक्ती परंपरेतील सामान्य माणसाचे केंद्रस्थान किंवा तांत्रिक परंपरेत अपवित्र मानल्या गेलेल्या गोष्टींमध्येही दैवत्व शोधण्याची वृत्ती, या सर्वांमध्ये समाजाच्या काठावर असणाऱ्यांचे पुनर्मूल्यांकन दिसते. त्यामुळे ‘झुरळ हेच नवे फुलपाखरू’ ही कल्पना एकप्रकारे प्रतिकाराची नवी भाषा ठरली आहे.
राजकीयदृष्ट्या, ‘काॅक्रोच जनता पार्टी’ची स्थापना ही आपल्या व्यवस्थापित लोकशाहीची मर्यादा दाखवते. जेव्हा लाखो तरुणांसाठी उपहास हाच सार्वजनिक सहभागाचा सर्वात प्रभावी मार्ग ठरतो, तेव्हा ते लोकशाहीच्या आरोग्याचे नव्हे, तर तिच्या आजारपणाचे लक्षण असते. कारण, बेरोजगारी, शैक्षणिक घोटाळे हीच ती कारणे आहेत जी या ‘उपद्रवाला’ जन्म देतात. झुरळ सौंदर्याची याचना करत नाही. ते फक्त सत्तेच्या स्वयंपाकघरात अस्तित्वाचा हक्क मागते. आणि समाजातील मतभेदांच्या कारणांचा शोध घेण्याऐवजी मतभेदच नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मानसिकतेची ते खिल्ली उडवते.
तरीही, कुरूप गोष्टींचे उदात्तीकरण करण्यात धोका आहे. झुरळाची ताकद हीच त्याची शोकांतिका आहे: केवळ जगणे म्हणजे विजय नव्हे. तरुणांना फुलपाखरासारखे उडायला सांगण्याऐवजी, झुरळासारखी सहनशीलता दाखवायला भाग पाडणारा देश आपले राजकीय वचन पाळण्यात अपयशी ठरलेला असतो.
त्यामुळे खरा प्रश्न झुरळाचे गौरवगान करण्याचा नाही. तर असा समाज उभा करण्याचा आहे, जिथे कोणालाही सन्मानाने जगण्यासाठी झुरळासारखे तग धरावे लागणार नाही. म्हणूनच, ‘झुरळ हेच नवीन फुलपाखरू’ हा केवळ उपहास नाही, तर सत्ता ज्या बाबींना पायाखाली चिरडून टाकणे पसंत करते, त्या बाबी सत्तेला ठळकपणे दाखवणारा हा आरसा आहे. झुरळांच्या प्रतीकातून या पिढीने जणू घोषणाच केली आहे की, ‘आम्ही नष्ट होणार नाही. तुम्हाला छान दिसावे म्हणून आम्ही स्वतःला सुंदर बनवणार नाही. आम्ही अंधाऱ्या कोपऱ्यातच वाढत राहू… आणि एक दिवस, आम्ही दिव्यांनी ती जागाही प्रकाशमान करू जिथे येण्यासाठी आम्हाला कधीच आमंत्रित केले गेले नाही. आम्हाला फुलपाखरू व्हायचे नाही. आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे : ‘ही बाग फक्त फुलपाखरांसाठीच का उभारली गेली?’
