Ram Gopal Varma on West Bengal Politics: आपल्या सडेतोड विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सध्या त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच ‘दाऊद इब्राहिममुळे माझं घर चालतंय’ असं खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या वर्मांनी आता ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने २०७ जागा जिंकून बहुमत मिळवले असतानाही, ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. या निकालांना ‘निवडणूक आयोगाचे षड्यंत्र’ संबोधणाऱ्या ममतांवर टीका करताना वर्मा म्हणाले की, “१५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतरही लोकशाही संस्थांवर हल्ला करणं धक्कादायक आहे.” बंगालच्या या राजकीय सत्तासंघर्षात आता चित्रपटसृष्टीतील कलाकारही व्यक्त होत आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा (TMC) पराभव झाला, पण तरीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हे ऐकून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना धक्का बसला आहे. वर्मांनी यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

राम गोपाल वर्मा काय म्हणाले?

राम गोपाल वर्मा एक्सवर एक पोस्ट करत म्हणाले, “अनेक दशकांपासून राजकारणात असूनही आणि १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतरही, ममता बॅनर्जी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत यावर माझा विश्वास बसत नाहीये. लोकशाहीचा मूळ गाभा हा संस्थांवर आधारित असतो आणि त्यावर हल्ला करणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला करण्यासारखं आहे.”

Ram Gopal Varma Reaction on Mamata Banerjee Resignation Issue West Bengal Election 2026
राम गोपाल वर्मांची पोस्ट (सौजन्य – एक्स)

ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या?

“निवडणूक निकाल हे जनमताचे प्रत्यंतर नसून, ते निवडणूक आयोगाने भाजपच्या साथीने रचलेले षड्यंत्र आहे. तृणमूल काँग्रेसने केवळ भाजपविरोधात नव्हे तर, निवडणूक आयोगाविरोधात निवडणूक लढवली. आयोगाने भाजपसाठी काम केले. लोकमताद्वारे पराभूत झाले नसल्याने राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. मी पराभूत झालेले नाही, त्यामुळे लोकभवन येथे (राजीनामा देण्यासाठी) जाण्याचा प्रश्नच नाही,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. दुसरीकडे, पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०७ जागा जिंकून सत्तास्थापनेची तयारी भाजपाने सुरू केली आहे. निवडणूक आयोगानेही निवडणूक निकालाची अधिसूचना राज्यपालांकडे पाठवली आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान त्यांना “धक्काबुक्की करण्यात आली आणि पोटात लाथ मारण्यात आली”, असा आरोप ममतांनी केला आहे. त्यांच्या मते, त्यांना मारहाण झाली तेव्हा तिथले सीसीटीव्ही कॅमेरे जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते. “माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे. एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे मी ‘इंडिया’ आघाडीला बळकट करेन. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही, त्यामुळे मी एक सामान्य नागरिक आहे. आता तुम्ही मला असे म्हणू शकणार नाही की मी तुमच्या पदाचा वापर करत आहे. मी आता पूर्णपणे स्वतंत्र आहे,” असं त्या म्हणाल्या.

“मी माझे संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. गेल्या १५ वर्षांत मी पेन्शनचा एक पैसाही घेतला नाही किंवा मी पगारही घेत नाहीये. पण आता मी मुक्त आहे, त्यामुळे मला काहीतरी काम करावं लागेल आणि ते मी नक्कीच करेन,” असं विधानही ममता बॅनर्जींनी केलं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल

बंगालच्या राजकारणात १५ वर्षांनी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने २०७ जागा जिंकून बहुमताचा १४८ हा आकडा पार केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला (TMC) फक्त ८० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आणि ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास नकार देत आहेत, ते पाहता सत्तांतर प्रक्रिया तितकीशी सोपी दिसत नाहीये.